भारत रशिया मैत्री काळाच्या कसोटीवर खरी उतरली ः मोदी | पुढारी

भारत रशिया मैत्री काळाच्या कसोटीवर खरी उतरली ः मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भारत रशिया मैत्री काळाच्या कसोटीवर खरी उतरली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम परिषदेत केले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी परिषदेत सहभाग घेतला होता. भारत रशिया मैत्री खूप जुनी आहे आणि ही काळाची गरजसुद्धा आहे, असे मोदी यांनी यावेळी नमूद केले.

मोदी म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचे आपण आभारी आहोत. भारतीय इतिहास आणि सभ्यतेत संगम या शब्दाला एक विशेष अर्थ आहे. नदी, लोक आणि विचारधारा जेव्हा एकत्र येतात, तेव्हा संगम होतो. कोरोना महारोगराईच्या काळात रशियाने भारताला मोठी मदत केलेली आहे.

लसीकरणासाठी रशियाने जी मदत केली, ती कधी विसरता येऊ शकत नाही. रशियाच्या 11 गव्हर्नरनी भारत दौर्‍यावर यावे, असे आपण आमंत्रण देतो. रशियाच्या अतिपूर्व भागाच्या विकासासाठी पुतीन यांनी जी मेहनत घेतली आहे, त्याचे आपण कौतुक करतो. रशियाचा हा दृष्टिकोन साकारण्यासाठी भारत रशियाचा विश्वसनीय भागीदार बनेल. ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमचे मुख्यालय रशियातील व्लादिवोस्तोक येथे आहे.

दरवर्षी याच शहरात ही परिषद घेतली जाते. रशिया तसेच आशिया खंडातील विविध देशांदरम्यान राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध विकसित करण्याचे काम ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमद्वारे केले जाते.

Back to top button