धुळे : आदिवासी विभागाच्या निधीवर महाविकास आघाडी सरकारचा डाका : भाजपचे प्रदेशाध्यक्ष  | पुढारी

धुळे : आदिवासी विभागाच्या निधीवर महाविकास आघाडी सरकारचा डाका : भाजपचे प्रदेशाध्यक्ष 

धुळे : पुढारी वृत्तसेवा

आदिवासी विभागाला कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन तो 31 मार्चच्या पार्श्वभूमीवर प्रभाव असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वळविण्यात आल्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. आदिवासी विभागाच्या या निधीवर डाका टाकण्याचे काम या सरकारने केले आहे. मात्र आता राज्यातील युतीचे सरकार आदिवासी विभागाचा निधी त्यांच्या विकासासाठीच वापरणार असल्याची माहिती सोमवारी (दि.12) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी त्यांनी याकूब मेमन यांच्या कबरीच्या मुद्द्यावरून देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पद वाचवण्यासाठीच सौंदर्यीकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा  आरोप केला आहे.

धुळ्यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीवर कठोर शब्दात टीकास्त्र साेडले.  यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपाचे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, महापौर प्रदीप करपे, प्रदेशाचे बबन चौधरी, डॉक्टर माधुरी बाफना यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. आदिवासी विभागातील निधीमध्ये डाका टाकल्यामुळेच आदिवासी भागाचा विकास थांबला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी या विभागाला करोडो रुपये निधी मंजूर करून हाच निधी 31 मार्चला पश्चिम महाराष्ट्रातील मोजक्या जिल्ह्यात वळवल्याची अनेक उदाहरणे आहेज. मात्र राज्यात भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्ता काळात या निधीमध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही. आदिवासींना न्याय देण्याचा प्रयत्न भाजपाच्या सरकारने केला असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

सत्ता गेल्याने महाविकास आघाडीची बिघाडी

राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेल्यामुळे ते चलबिचल झाले आहेत. त्यामुळे आरोप करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहेत. गेल्या अडीच वर्षाच्या काळात गुप्तचर विभाग आणि पोलीस विभागाने याकूब मेमन याच्या कबरीचे सौंदर्यकरण होत असल्याची माहिती देऊन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाने त्यांना माहिती देऊन देखील सौंदर्यीकरण थांबवण्याची उद्धव ठाकरे यांची हिम्मत नव्हती. मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी तुम्ही कोणतीही तडजोड करायला तयार होते. त्यामुळेच या कबरीचे तुम्ही सौंदर्यकरण होऊ दिले असा टोला बावनकुळे यांनी लावला आहे.

न्यायालयावर टीका अयोग्य

काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी यांच्याकडून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल प्रश्नचिन्ह उभे करण्याची हिम्मत झाली आहे. भारताच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रभावाखाली काम करत नाही. त्यामुळे न्यायालयावर अशा पद्धतीचा आरोप करणे चुकीचे असून यावर जास्त चर्चा करणे योग्य नसल्याचे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button