सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती | पुढारी

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : हरियाणा येथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि टिकटॉक स्टार तथा अभिनेत्री सोनाली फोगाट यांचा गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (सोमवार) पणजी येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

पत्रकारांनी सोनाली फोगाट यांच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे द्यावा अशा सातत्याने होणाऱ्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता, मुख्यमंत्री सावंत म्हणाले, हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे असे सोनाली फोगाट यांची कन्या यशोधरा तसेच तेथील नागरिकांची मागणी आहे. मात्र गोवा पोलिस या प्रकरणी चांगला तपास करत आहेत.

सोनाली फोगाट यांच्या स्वीय सचिवांनी आपण संपत्तीसाठी सोनाली फोगाट यांचा ड्रग्ज देऊन खून केल्याचे कबुलीही दिलेली आहे. गोवा पोलिसांनी गोव्यातच नव्हे तर हरियाणा मध्ये जाऊनही अनेकांच्या जबान्या घेतलेल्या आहेत. गोवा पोलिस या प्रकरणी चांगला तपास करत आहेत. मात्र तरीही हरियाणा येथील लोकांनी वारंवार सुरू केलेली सीबीआय तपासाची मागणी त्याचबरोबर सोनाली फोगाट यांची कन्या यशोधरा यांनीही सातत्याने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची सुरू ठेवलेली मागणी लक्षात घेऊन आपल्या सरकारने आता हे प्रकरण सीबीआयकडे देण्याचे ठरवले आहे असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आपण आजच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सोनाली फोगाट यांच्या मृत्यूचे प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी विनंती करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

 

Back to top button