नगर : ‘माध्यमिक’ची चौकशी गुलदस्त्यात ! | पुढारी

नगर : ‘माध्यमिक’ची चौकशी गुलदस्त्यात !

नगर : पुढारी वृत्तसेवा :‘माध्यमिक’ शिक्षणच्या कारभाराबाबत प्राप्त तक्रारीची शिक्षण उपसंचालकांनी गंभीर दखल घेतली आहे. संबंधित अधीक्षक वर्ग 2 कर्मचारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याविरोधातील ‘त्या’ तक्रारींच्या अनुषंगाने मुद्देनिहाय चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना देण्यात आल्या. मात्र, आता महिना उलटूनही याप्रकरणी अद्याप चौकशी झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील राजेंद्र मुरलीधर शिंदे यांनी या संदर्भात तक्रार दिलेली आहे. त्यात, माध्यमिकच्या ‘वर्ग 2 चे सत्यजित मच्छिंंद्र यांनी शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी व माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांना हताशी धरून संगनमताने बनावट दस्तऐवज तयार शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत.

शिक्षक भरती सन 2012 पासून बंदी असतांना सन 2016 ते 2021-22 पर्यंत अनेकांना वैयक्तिक मान्यता देऊन तसेच मागील वर्षांच्या नेमणुका देऊन कोटीचे फरक बिल काढून शासनाची फसवणूक केल्याचेही शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या अर्जाची दखल घेवून शिक्षण उपसंचालक औदुंबर उकीरडे यांनी 25 जुलै 2022 रोजी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना लेखी पत्र काढून याप्रकरणी चौकशी करावी, तसेच 15 दिवसांत तो अहवाल सादर करावा, अशी मागणी केली होती. मात्र, आता ऑगस्ट उलटला तरीही अद्याप याप्रकरणी कार्यवाही न झाल्याने शिंदे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा मानस व्यक्त केला आहे.

चौकशी कोणी करावी; पेच निर्माण!
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील ‘शिक्षणाधिकारी’ हे एकाच दर्जाचे आहेत. असे असताना उपसंचालकांनी आपल्या पत्रात ‘माध्यमिक’च्या शिक्षणाधिकार्‍यांची चौकशी करण्याची जबाबदारी ‘प्राथमिक’कडे दिले आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे. या संदर्भात चौकशी अधिकारी म्हणून अन्य वरिष्ठ अधिकार्‍याची नियुक्ती करावी, असाही सूर तक्रारदारानी आळवल्याचे समजले.

Back to top button