नाशिक : बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त | पुढारी

नाशिक : बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट उद्ध्वस्त

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वन परिक्षेत्र कार्यालयाने बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला असून, तस्करांशी झालेल्या झटापटीत वनविभागाच्या अधिकार्‍याला हवेत गोळीबार करावा लागला. सोमवारी नाशिक उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

वनविभागाला गुप्त बातमी मिळाल्याने अधिकारी भाऊसाहेब राव यांनी बनावट ग्राहक बनून तस्करांशी संपर्क साधत ठराविक रकमेचा व्यवहार केला. मात्र, संशयितांनी वेळोवेळी चार ठिकाणे बदलून वनविभागाला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. अखेर बिबट्याच्या कातडीची खरेदी करण्यासाठी मौजे अंबोली (ता. त्र्यंबक) येथे संशयित कातडी घेऊन आले असता त्याच ठिकाणी वनक्षेत्रातील कर्मचारी व संशयितांमध्ये झटापट झाली. या दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांना हवेत गोळीबार करावा लागला. या कारवाईत वनकर्मचार्‍यांनी एकूण चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून बिबट्याची कातडी व दोन दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.

यात संशयित प्रकाश लक्ष्मण राऊत (43, रा. रांजणपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर), परशुराम महादू चौधरी (30, रा. चिंचुतारा, ता. मोखाडा, जि. पालघर), यशवंत हेमा मौळी (38, रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर), हेतू हेमा मौळी (38, रा. कुडवा, ता. मोखाडा, जि. पालघर) या तस्करांना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई नाशिक उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग, वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वन परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, शैलेश झुटे, पोपट डांगे, सचिन दिवाने यांच्यासह वनरक्षक फैजअली सय्यद, आर. टी. पाठक, मुज्जू शेख, गुव्हाडे, पी. डी. गांगुर्डे, जी. डी. बागूल, विठ्ठल गावंडे, एस. पी. थोरात, सी. डी. गाडर, राहुल घाटेसाव, संतोष बोडके, ए. एस. निंबेकर, एम. ए. इनामदार, मधुकर चव्हाण, एन. ए. गोरे, के. वाय. दळवी, एस. ए. पवार यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा :

Back to top button