रेल्वे गुन्ह्यांत महाराष्ट्र पुढे | पुढारी

रेल्वे गुन्ह्यांत महाराष्ट्र पुढे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या वर्षी 2021 मध्ये सर्वाधिक रेल्वे प्रवासी आणि गुन्ह्यांची नोंद झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात आरपीएफने 96 हजार 600 गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यात महिला आणि दिव्यांगकरिता राखीव असलेल्या डब्यांमधून बेकायदेशीर प्रवास करणे,लोकलच्या टपावरुन प्रवास करणे, अनधिकृत फेरीवाल्यांचा वावर या गुन्ह्यांचा समावेश आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे मार्गावरुन दररोज लोकलच्या सुमारे साडे हजार फेर्‍या होतात. तर राज्याच्या कानाकोपर्‍यापयर्ंत मेल-एक्स्प्रेस धावतात. उपनगरीय रेल्वेतून दिवसाला 65 लाख प्रवासी करतात. रेल्वे मालमत्तेचे संरक्षण आणि प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी आरपीएफची आहे.

गेल्या वर्षात झालेल्या खून, दरोडे आणि अपहरणाच्या 10 हजार 280 गुन्ह्यांमुळे राज्य तिसर्‍या क्रमांकावर आहे. 2019मध्ये आरपीएफने प्रवासी आणि मालमत्तेशी संबंधित दोन लाख 44 हजार गुन्ह्यांची नोंद केली होती. तर रेल्वे पोलिसांनी 45 हजार 341 गुन्हे दाखल केले होते. गेल्या वर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी 85 टक्के गुन्हे हे (आठ हजार 753) चोरीचे आहेत. मेल-एक्स्प्रेसमध्ये चोर्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. या चोरीच्या घटना रोखण्यासाठी आरपीएफने विविध योजना राबविल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच आरपीएफने दिल्ली-मुंबई, गोवा, एर्नाकुलम आणि वसईमार्गे दक्षिणेला जाणार्‍या गाड्यांमध्ये चोरी करणार्‍या टोळीला पकडले होते. एनसीआरबीच्या अहवालात 2021 मध्ये राज्यात विनयभंगाच्या 55, पोक्सोच्या 14 आणि बलात्काराच्या 6 घटनांची नोंद झाली आहे.

Back to top button