लवंगी मिरची : एक हाथ देना, एक हाथ लेना? | पुढारी

लवंगी मिरची : एक हाथ देना, एक हाथ लेना?

‘मालक, जरा उचल देता का?’
‘का बुवा? मागच्या आठवड्यात वारलेली तुझी आजी आज पुन्हा वारली का? वैकुंठासाठी पैसे लागतायेत?’
‘नाही हो.’
‘मग नवीन काय करतोयस? बायकोला पुन्हा अ‍ॅडमिट करतोस हॉस्पिटलला? बायामाणसांची बिमारी, वगैरे सांगून?’
‘तसंही नाही मालक. माझ्या मागे फार तर शिक्षणाची बिमारी लागलीये म्हणा!’
‘का? माझ्या मते शिक्षणाला काही इमर्जन्सी अ‍ॅडमिट करावं लागत नसावं.’
‘ चेष्टा चाललीये असं समजू नका सर. खरंच मुलांच्या शाळा, कॉलेजच्या खर्चाने पार जेरीला आलोय मी.’
‘तू लेका पहिल्यापासून असाच कुरकुर्‍या! तिकडे सरकार तर शिक्षणावरचा खर्च कमी कमी करायला निघालंय. मुलींना फ्रीमध्ये शिकवणं, शिक्षण संस्थांच्या मनमानीवर चाप, असं एकेक नवं तंत्र आणत चाललंय.’
‘नुसता तेवढ्याचा काय उपेग मालक?’
‘मग तुम्हाला काय शाळा-कॉलेजात जाण्याबद्दल इनामं द्यायला हवीयेत सरकारने?’
‘तेवढं नको. निदान जीएसीकडे बघा म्हणावं.’
‘ते कस्काय?’
‘अहो, इकडे परवडणारं शिक्षण हे धोरण आणायचं आणि तिकडे प्रत्येक शैक्षणिक साहित्यावर जीएसटी लादायचा असं चाललंय ना?’
‘काय सांगतोस? अशी शमश्या आहे होय ह्या प्रॉब्लेमची?’
‘आता काय सांगावं? क्रमिक पुस्तकांवर जीएसटी नाही, पण ते बनवताना कागद, छपाई, बांधणी ह्या सर्वांवर तो थोपलेला आहेच. मग पालकांना पुस्तकं कशी स्वस्तात भेटणार?’
‘असं लफडं केलंय होय?’
‘तर हो. पेनं, पेन्सिली, चित्रकलेचं साहित्य, हे सगळंच महाग झालंय जीएसटीपायी. आमची कार्टीतर, आपला बाप पेपर मिलचा मालक असावा, अशा थाटात टरकावत असतात कागदं.’
‘ते मात्र चालतंच पोरांचं.’
‘नकाशे, तक्‍ते, पृथ्वीचा गोल, काहीही आणायचं झालं तर शंभरच्या नोटा कापरासारख्या जळतात बघा.’
‘जीवच जळत असेल नाही त्याने?’
‘त्यात खासगी कोचिंग कलासांची आबदा वेगळीच. त्यांच्यावर तब्बल 18 टक्के जीएसटी लावलाय सरकारने.’
‘अच्छा, म्हणजे त्यांच्या मते, शिक्षण संस्थांचे नियम खासगी क्लासेस ना लागू नाहीत का?’
‘नाहीत. इकडे आठवी ते बारावीपर्यंतच्या चाळीस टक्के मुलांना तरी एक ना एक क्लास लागतोच लागतो.’
‘का? शाळेत अभ्यास करून घेत नाहीत का?’
‘तो मुद्दा शेप्रेटे. पालक किती भरडले जातात हे बघा मालक. एकेका पोराला निदान ग्रॅजुयट करेपर्यंत पुरता दम निघतो आयबापाचा.’
‘आसं असेल तर कठीण आहे.’
‘आहेच हो. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात
शिक्षण आणि शैक्षणिक वस्तू महाग करणं शोभतं का सरकारला?’
‘अजाबात नाही.’
‘बि—टिश सरकारच्या चुकीच्या करांवर देशभर दंगे व्हायचे तसं होया, हवंय का आताच्या सरकारला? नकोय ना? मग म्हणावं, एक हाथसे देना, दुसरे हाथसे लेना, बंद करा. देश खरोखरच शिक्षणस्नेही करा.’

– झटका

Back to top button