मुंबईसाठी आघाडी करण्यास शिवसेना-राष्ट्रवादी तयार; दोन्ही पक्षांत एकमत | पुढारी

मुंबईसाठी आघाडी करण्यास शिवसेना-राष्ट्रवादी तयार; दोन्ही पक्षांत एकमत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिका निवडणूक एकत्रित लढवण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. त्यामुळे मुंबईतील कोणते प्रभाग शिवसेनेकडे राहतील व कोणते राष्ट्रवादीकडे जातील, याबाबत लवकरच दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याचे सोमवारी सांगण्यात आले.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीची सत्ता आली. शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटींमुळे सरकार गडगडले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिलेली साथ मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्येही निभावण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा आधार नसला तरी काही भागात राष्ट्रवादीला मानणारे, विशेषत: पवार कुटुंबीयांना मानणारे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील काही मतदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणे शिवसेनेसाठी फायदेशीर ठरू शकते. मुंबईत 2002 पासून राष्ट्रवादीचे 13 ते 14 नगरसेवक निवडून येतात. 2017 मध्ये मात्र अवघे 9 नगरसेवक निवडून आले होते. सुमारे 20 ते 25 प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी दुसर्‍या क्रमांकाची तर काही ठिकाणी तिसर्‍या क्रमांकाची मते घेतली होती.

जागावाटपावर चर्चा करण्यासाठी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष राखी जाधव, शिवसेना नेते अनिल परब, अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, अरविंद सावंत आदींची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याचे समजते. या बैठकीत फॉर्म्युला ठरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीत 227 प्रभाग राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस किमान 45 ते 50 प्रभागांवर दावा करू शकते. त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला सुमारे 177 प्रभाग येऊ शकतात. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोबत आघाडी झाल्यास शिवसेनेला काँग्रेससाठी किमान 70 ते 80 प्रभाग सोडावे लागतील. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या प्रभागांमध्येही कपात होऊ शकते.

Back to top button