नाशिक: जिल्हा टीडीएफच्या वतीने आत्मक्लेश  | पुढारी

नाशिक: जिल्हा टीडीएफच्या वतीने आत्मक्लेश 

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सत्ताधारी कार्यकारिणीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत जिल्हा टीडीएफच्या वतीने रविवारी (दि. 28) दुपारी 12 वाजता एनडीएसटी ॲण्ड एनटी सोसायटीच्या (एनडीएसटी) कार्यालयासमोर जिल्हा टीडीएफचे अध्यक्ष आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखाली आत्मक्लेश सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील जवळपास 11 हजार प्राथमिक माध्यमिक व आश्रमशाळा शिक्षकांची अर्थवाहिनी असलेली एनडीएसटी सोसायटी गेल्या पाच-सहा वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आहे. सोसायटीच्या साठ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देऊन त्यांच्या फरकाची रक्कम संचालक मंडळाने हडप केल्याने या प्रकरणात चेअरमनसह दोन कर्मचारी रंगेहाथ पकडले गेले होते. गेली 55 वर्षे एनडीएसटी स्वभांडवलावर सुरू होती. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा संचालक मंडळाने 60 ते 70 कोटी रुपयांच्या बाह्यठेवी स्वीकारल्या आहेत. विशेष म्हणजे सभासदांसाठी 7 टक्के कर्जाचा व्याजदर आहे व बाह्यठेवींसाठी 8 टक्क्याने व्याज दिले जाते. या अनिष्ट प्रकाराबाबत तसेच इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती, तरी संघटनेचे पदाधिकारी संस्थेच्या आवारात आंदोलनासाठी उपस्थित झाले होते. या ठिकाणी भद्रकाली पोलिस ठाण्याचे अधिकारी आले आणि त्यांनी मध्यस्थी केल्याने संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून प्रवेशद्वाराजवळ बोलावण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वागत करीत आंदोलन स्थगित केले. आंदोलनास मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन देशमुख, मालेगाव टीडीएफचे कार्यवाह आशिष पवार, माध्यमिक शिक्षक संघाचे राज्य समन्वयक नीलेश ठाकूर, शिक्षक भारतीचे सुधीर पाटील, मालेगाव तालुका टीडीएफचे अध्यक्ष जयेश सावंत, स्नेहलता पवार, यू. के. आहेर, रवींद्र येवले, वासुदेव बधान आदी सभासद उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button