पिंपरी : शहरातील बाजारपेठा फुलल्या | पुढारी

पिंपरी : शहरातील बाजारपेठा फुलल्या

पिंपरी :  पुढारी वृत्तसेवा : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त रविवारच्या सुटीचे औचित्य साधून शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीची संधी साधली. गणेशोत्सवानिमित्त प्रामुख्याने सजावट आणि पूजासाहित्याची खरेदी केली जात होती. त्यासाठी शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. कोरोनाचे सावट पूर्णतः सरले नसले तरीही कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आहे.

त्यामुळे रिद्धी सिद्धीची आदिदेवता श्री गणरायाचे स्वागत यंदा मोठ्या दिमाखात करण्यात येणार आहे. बाजारपेठांमध्ये मंगलमूर्तीच्या मोहक मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. पुजेच्या सामानाची, श्रींच्या आभुषणांची, मखरांची, वस्त्रांची दुकाने सजली आहेत. सजावटीचे वैविध्यपूर्ण साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची पावले रविवारी बाजारपेठांकडे वळली. त्यामुळे पिंपरी, चिंचवड, भोसरी येथील बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या.

Back to top button