सोमेश्वरचे तळे अद्याप निम्म्यावर; बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत | पुढारी

सोमेश्वरचे तळे अद्याप निम्म्यावर; बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: समाधानकारक पाऊस न झाल्याने सोमेश्वर मंदिर परिसरातील प्राचीन सोमयाचे तळे निम्मे भरले असून, ते भरण्यासाठी अजून पावसाची गरज आहे. बारामती तालुक्यातील काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. ऑगस्ट महिना संपायला दोन दिवस बाकी असून गणेशोत्सवात पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी आहेत. वरुणराजा बरसत नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. काही भागात तर ऐन पावसाळ्यात पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. विशेषतः जिरायती भागाला पावसाने ओढ दिल्याने पिकांची काळजी शेतकर्‍यांना सतावत आहे.

वीर धरणातून निरा नदीत दीड महिन्यापासून कमी- अधिक प्रमाणात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग पाऊस थांबल्याने बंद करण्यात आला आहे. जिरायती भागातील ओढे, तलाव, नाले अजूनही म्हणावे तसे भरले नाहीत. समाधानकारक पाऊस न झाल्याने सोमेश्वर मंदिर परिसरातील प्राचीन सोमयाचे तळे निम्मे भरले असून ते भरण्यासाठी अजून पावसाची गरज आहे.

दरवर्षी हे तळे जून-जुलैमध्ये निम्मे, तर ऑगस्टमध्ये संपूर्ण भरते. या पाण्याचा वापर परिसरातील ग्रामस्थांना वापरण्यासाठी तसेच जनावरांच्या पाण्यासाठी व शेतीसाठीही होतो. दरवर्षी ओव्हरफुल होणारे हे तळे उन्हाळ्यात शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरते. पुढील महिनाभरात मुसळधार पाऊस पडेल या आशेवर या भागातील शेतकरी आहेत. बारामती तालुक्याला वरदान ठरलेल्या निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

Back to top button