...मग मीच कसा अस्तरीकरण करेल : अजित पवार | पुढारी

...मग मीच कसा अस्तरीकरण करेल : अजित पवार

अनिल तावरे

सांगवी : मागील काही वर्षांपासून काही जण धरणापासून निरा डाव्या कालव्याऐवजी बंद जलवाहिनीद्वारे शेतीसाठी पाणी आणण्यासाठी हट्ट करत होते. बंद जलवाहिनीच्या योजनेला सर्वच शेतकर्‍यांच्या हितासाठी माझा विरोधच होता. मग मी कसा सगळेच अस्तरीकरण करेल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. सर्वांना शेतीसाठी समान पाणी मिळण्यासाठी निरा डाव्या कालव्याला ज्या भागात जास्त गळती आहे, तेवढ्याच भागासाठी अस्तरीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रविवारी (दि. 28) अजित पवार बारामतीच्या दौर्‍यावर आले असता निरा डावा कालवा बचाव समितीच्या वतीने माळेगाव कारखान्याचे संचालक मदनराव देवकाते, माजी संचालक बाळासाहेब वाबळे, दूध संघाचे माजी अध्यक्ष नितीन आटोळे, संचालक संजय देवकाते, किरण तावरे यांनी अस्तरीकरणाला पाठिंबा म्हणून लेखी निवेदन दिले. त्या वेळी अजित पवार यांनी वरील प्रतिपादन केले.

मागील भाजप- शिवसेना युती सरकारच्या काळात आपल्याच तालुक्यातील माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी वीर धरणापासून बंद जलवाहिनीद्वारे शेतीसाठी पाणी आणण्यासाठी हट्ट केला होता. कालव्याच्या लगतचे व शेवटच्या टोकाचे शेतकरी आपलेच असल्यामुळे मी कशाला संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण करेल, असे सांगून अजित पवार म्हणाले की, संबंधित कालवा अनेक वर्षे झाल्याने जीर्ण झाला आहे.

ज्या भागात जास्त गळती आहे किंवा वारंवार कालवा फुटल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी मजबुतीकरण करून आवश्यक त्या ठिकाणी अस्तरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एकूण कालव्याच्या लांबीत आवश्यक ठिकाणी एकूण सात किलोमीटर अंतराचे अस्तरीकरण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्यातीलच पणदरे भागातील काही लोक या योजनेची माहिती नीट न घेता उगाचच तालुक्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. या विषयाबाबत मी लवकरच मेळावा घेणार असून, आपल्याच लोकांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. तोपर्यंत जलसंपदा विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांनी मिळून संबंधित भागात जाऊन या अस्तरीकरणाची माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Back to top button