जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : त्यांनी ईडी लावली तर आम्ही सीडी लाऊ या गाजलेल्या वक्तव्यावर आज एकनाथ खडसे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. आपण पोलिसांकडे सीडी दिली असून योग्य वेळी दाखवणार असल्याचे एकनाथ खडसे (Eknath khadase) म्हणाले.
आज प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे (Eknath khadase) यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ईडी लावली तर सीडी लावेन असं मी म्हणालो होतो. हे खरं आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून ती सीडी पोलिसांकडे दिली आहे. पोलिस त्याची चौकशी करत आहेत. चौकशी अहवाल आल्यानंतर लवकरच मी हा अहवाल जाहीर करणार आहे, असं खडसे म्हणाले.
जे भ्रष्टाचार करतात, गैरव्यवहार करतात त्या लोकांवर आम्ही कारवाई करतो, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
त्यामुळे मला अपेक्षा आहे की दादांनी त्यांच्या शेजारी बसणाऱ्या लोकांची चौकशी करावी. त्यांनी माझी ईडीची चौकशी लावली हे चंद्रकांतदादांनी मान्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
विधानसभेत मी वारंवार विचारलं माझा दोष काय आहे ते सांगा. आता ईडीने चौकशी लावली. ती कोर्टात काय व्हायचं ते होईल, असंही त्यांनी सांगितलं.
गेल्या ४० वर्षात माझ्यावर एकही आक्षेप आलेला नाही. राजकारणात कधीही कुणी माझ्याविरोधात काही बोललेलं नाही. पण जमिनीबाबत माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप करण्यात आला.
कोर्टानेही आरोपात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे कर नाही तर डर कशाला? त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे असे एकनाथराव खडसे म्हणाले.