देशात वाहनांच्या नोंदणीसाठी केंद्राची बीएच-सीरिज : केंद्र सरकारचा निर्णय | पुढारी

देशात वाहनांच्या नोंदणीसाठी केंद्राची बीएच-सीरिज : केंद्र सरकारचा निर्णय

मुंबई/नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशात एका राज्यातून दुसर्‍या राज्यात वाहनाचे स्थलांतर करणार्‍या मालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. केंद्र शासनाने 26 ऑगस्टला जारी केलेल्या नव्या सूचनेमध्ये स्थलांतरित वाहनांच्या नोंदणीसाठी नवी भारत मालिका (बीएच-सीरिज) सुरू केली आहे.

या नव्या सीरिजमुळे वाहनांच्या पुनर्नोंदणी प्रणालीचे केंद्रीकरण होणार असून ही प्रक्रिया अधिक सुलभ होईल, असा दावा शासनाने केला आहे. दरम्यान, वाहन मालकांना 15 सप्टेंबरपासून नव्या सीरिजमध्ये नोंदणी करता येणार आहे.

शासनाच्या या नव्या सीरिजमुळे एका राज्यातून किंवा केंद्रशासित प्रदेशातून दुसर्‍या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात वाहनाचे स्थानांतर करताना वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. त्यामुळे वाहन मालकांची मोठी डोकेदुखी दूर होणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या बीएच-सीरिज अंतर्गत वाहन नोंदणीची सुविधा ही ऐच्छिक असेल.

विशेषतः संरक्षण विभागातील कर्मचारी, केंद्र शासकीय कर्मचारी, राज्य शासकीय कर्मचारी, केंद्र व राज्य शासनाअंतर्गत असलेले सार्वजनिक उपक्रमातील कर्मचार्‍यांना या नव्या सीरिजचा अधिक उपयोग होईल. याशिवाय खासगी क्षेत्रातील ज्या कंपन्यांची कार्यालये चारहून अधिक राज्यांत विखुरलेली आहेत, त्यांनाही स्वैच्छिक आधारावर या नव्या नोंदणी सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात वाहन घेऊन गेल्यानंतर त्याची पुन्हा नोंदणी करणे मालकांना अधिक वेळखाऊ वाटत होते. त्यावर आयटी-आधारित उपायाची मागणी वाहन मालकांमधून केली जात होती.

या नव्या बदलानंतर देशाच्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील वाहनांचे स्थानांतर प्रक्रिया नक्कीच सुलभ होईल, असा विश्वास केंद्र शासनाने व्यक्त केला आहे. नव्या बीएच सीरिजमुळे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणार्‍या वाहनांना पुन्हा नोंदणीची गरज भासणार नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे.
…म्हणून हा निर्णय महत्त्वाचा!

सध्या एका राज्यातील नोंदणीकृत वाहनाचा वापर दुसर्‍या राज्यात करण्यासाठी शासनाकडून कमाल 12 महिन्यांचा अवधी मिळत होता. त्यानंतर 12 महिने संपण्यापूर्वी वाहन मालकाला वाहनाची दुसर्‍या राज्यात पुन्हा नोंदणी करावी लागत होती.

दरवर्षी कराव्या लागणार्‍या नोंदणी प्रक्रियेमुळे वाहन मालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र नव्या सीरिजमुळे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात वाहनाचे स्थानांतर करणेही सोपे होणार आहे.

अशी असेल नवी बीएच-सीरिज

* नव्या वाहन नोंदणी मालिकेत ‘YY BH # # # # XX’ या क्रमाने वाहनास क्रमांक दिले जातील.

* यामध्ये “YY’ म्हणजे वाहनाच्या पहिल्या नोंदणीचे वर्ष असेल.

* “BH’ म्हणजे भारत सीरिजचा कोड असेल.

* ‘# # # #’ अशाप्रकारे चार वेळा हॅश वापरलेल्या ठिकाणी 0000 ते 9999 दरम्यानचा एक क्रमांक असेल.

* “XX’ या दोन एक्सऐवजी वाहनाच्या क्रमांकामध्ये ए ते झेड या दरम्यानच्या दोन इंग्रजी अक्षरांचा समावेश असेल.

* नव्या बीएच-सीरिजमुळे एका राज्यातून दुसर्‍या राज्यात नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त स्थलांतर करणार्‍या मालकाला वाहनाची पुन्हा पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही.

* नव्या सीरिजमध्ये नोंदणीसाठी 10 लाखांहून कमी किमतीच्या वाहनांना 8 टक्के, 10 ते 12 लाख किमतीच्या वाहनांना 10 टक्के आणि 20 लाखांहून अधिक किंमतीच्या वाहनांना 12 टक्के रोड टॅक्स भरावा लागेल.

* नव्या सीरिजसाठी डिझेलवर धावणार्‍या वाहनांना 2 टक्के अधिक, तर इलेक्ट्रिकवर धावणार्‍या वाहनांना 2 टक्के कमी रोड टॅक्स भरण्याची तरतूद शासनाने केली आहे.

Back to top button