वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
इसिस हल्लेखोरांना सोडणार नाही. काबूल विमानतळावर हल्ला करून अनेक निष्पापांचा बळी घेणारे कोण आहेत, याची माहिती आम्हाला आहे. आम्ही त्यांना शोधून काढू आणि एकेकाला वेचून मारू, असा खणखणीत इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिला.
इसिस हल्लेखोरांनी काबूल विमानतळावर गुरुवारी रात्री झालेल्या आत्मघाती बॉॅम्बस्फोटात 110 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 13 अमेरिकन सैनिक आहेत. सुमारे पंधराशे जखमी झाले आहेत. या हल्ल्यात बळी गेलेल्या सैनिकांना आदरांजली म्हणून देशभरातील सरकारी इमारतीवरील अमेरिकन ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आले. काही क्षण मौन पाळण्यात आले.
या हल्ल्याला अमेरिकेने इसिस संघटनेला जबाबदार धरले. शुक्रवारी व्हाईट हाऊसमधून बोलताना बायडेन या हल्ल्यात बळी गेलेले नागरिक आणि अमेरिकन सैनिकांबद्दल अत्यंत भावूक झालेले दिसले. ते म्हणाले, गुरुवारी करण्यात आलेला हल्ला हा इस्लामिक स्टेटच्या प्रांतिक गटाने केला आहे.
या हल्ल्याची किंमत तुम्हाला चुकती करावी लागेल. आम्ही तुम्हाला वेचून मारू. एकेक अमेरिकनच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. या गटाने तालिबानशी हातमिळवणी केल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी करण्यात आलेले हल्ले कुणाच्या इशार्याने करण्यात आले ते आम्हाला माहीत आहे. त्यांना निश्चितच धडा शिकवू, असा इशारा बायडेन यांनी दिला. बायडेन म्हणाले की, आम्ही योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी इसीस दहशतवाद्यांना ठेचून काढू. त्यांना आम्ही डोके वर काढू देणार नाही. आम्ही सर्व अमेरिकन नागरिकांची सुटका करूच. त्याबरोबरच आमच्या अफगाण मित्रांनाही बाहेर काढू.
इसीसला ठेचण्याची जय्यत तयारी करण्यात येत असून त्यांच्या मालमत्ता, नेते आणि अड्ड्यांवर हल्ला करण्याच्या योजना तयार करण्याच्या सूचना राष्ट्राध्यक्षांनी लष्करी कमांडरांना दिल्या आहेत, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी सांगितले. त्यामुळे आता ठोस प्रत्युत्तर देण्यात येईल. मात्र सध्या अमेरिकनांना युद्धपातळीवर अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याचे काम प्राधान्याने पूर्णत्वास नेण्यात येईल, असे मॅकेन्झी यांनी सांगितले.
इसीसने स्वीकारली जबाबदारी
या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी इसीसच्या खुरासान गटाने घेतली आहे. अमेरिकी सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनी या हल्ल्यात 13 मरीन कमांडोंचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. गुरुवारी रात्री हा हल्ला झाल्यानंतर काही वेळाने विमानतळाशेजारी जोरदार गोळीबार झाल्याच्या घटनाही घडल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. विमानतळाच्या अब्बे गेटवर पहिला हल्ला झाला. त्यानंतर काही वेळात दुसरा हल्ला बैरन हॉटेलजवळ झाला. येथे ब्रिटनच्या सैनिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. एअरपोर्टच्या बाहेर तिघे संशयित फिरताना दिसून आले होते. त्यातील दोघे आत्मघाती बॉम्बर होते.
तालिबान्यांकडेे किल लिस्ट!
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातून घरवापसी प्रक्रियेची देखरेख करणार्या अमेरिकी अधिकार्यांनी तालिबान्यांना एक यादी सोपविली आहे. त्यात मदत करणारे अमेरिकन, ग्रीन कार्डधारक तसेच अफगाणी नागरिकांची नावे आहेत. या नागरिकांना काबूल विमानतळापर्यंत पोचण्यात कोणताही अडथळा येऊ नये, हा उद्देश यामागे असला तरी, त्याचा तालिबानकडून दुरुपयोग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तालिबानच्या ताब्यानंतर अफगाणिस्तान सोडणार्या नागरिकांना तालिबान्यांकडून होणार्या कठोर तपासणीला सामोरे जावे लागत आहे. किमान आपल्याला मदत करणार्यांना तरी यातून सूट मिळावी, असा प्रयत्न अमेरिकी अधिकार्यांनी केला. मात्र, त्यांनी दिलेल्या यादीत अफगाणी नागरिकांचीही नावे असल्याची माहिती समोर आली आहे. तालिबानी आतापर्यंत अमेरिकेला मदत करणार्यांचा शोध घेत त्यांची हत्या करीत आले आहेत. हा पूर्वानुभव पाहता यादीत समाविष्ट असलेल्या अफगाणिस्तानातील नागरिकांसोबत तालिबानी काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत असून ही यादी एकप्रकारे तालिबानसाठी किल लिस्ट ठरण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे अनेक नागरिक तालिबानच्या तावडीत सापडून मारले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमेरिकी अधिकार्यांनी केलेल्या या घोडचुकीबद्दल सिनेटर्स आणि लष्करातील अधिकार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रकार म्हणजे अफगाणी नागरिकांना मृत्यूच्या दारात लोटण्यासारखा असल्याचे मत अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने व्यक्त केले.