

आचरा ; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या जनआशीर्वाद यात्रेतील ग्रामस्थांचा प्रचंड जनसमुदाय पाहून विरोधकांना ताप येऊ लागला आहे. त्यांना तपासण्याची वेळ आली आहे. त्याचा पायाखालची जमीन सरखली आहे. विरोधकांना माझ्या यात्रेने भिती वाटू लागल्याचे केंद्रीय मंत्री राणे यांनी आज (दि.२८) आचरा येथे जनआशिर्वाद यात्रे दरम्यान म्हटले आहे.
मालवण आचरा परिसरातील मला नागरिकांच्या तक्रारी येत असतात इथला स्थानिक आमदार कामे करत नाही. इथला आमदार कोण आहे याबाबत काही लोकांना माहितही नाही. आमदाराने कामे करावे असेही केंद्रीय मंत्री राणे म्हणाले.
कोणताही जातधर्म पक्षीय भेदभाव न करता मला कोकणचा विकास करायचा आहे. त्यासाठी कोकणातील तरुणांनी उद्योग क्षेत्राकडे वळले पाहिजे. त्यांना या क्षेत्रात 'आत्मनिर्भर' करण्याची जबाबदारी मी घेईन.
माझ्याकडे सूक्ष्म, लघू मध्यम उद्योग विभाग आहे. याद्वारे उद्योगांसाठी अर्थसाहाय्य करून सबसिडीही त्यांना देण्यात येईल. असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान वक्तव्य केले.
केरळच्या धर्तीवर कोकणचा विकास साधायचा आहे. कोणताही हात कामाशिवाय रिकामा राहणार नाही तरुण बेरोजगार राहणार नाही.
माझ्याकडे असलेल्या मंत्रीपदाचा फायदा मी कोकणसाठी करणार आहे.
त्यामुळे येथील तरुण पिढी उद्योजक होईलच, शिवाय युवापिढी इतरांनाही रोजगार उपलब्ध करू शकेल.
कोकणातील तरुणांनी उद्योजक बनविण्यासाठी कोकणात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आचरा येथे दिली.
यावेळी राणे म्हणाले की सूक्ष्म, लघु मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ कोकणातील नव उद्योजकांनी घेतला पाहिजे.
लघु उद्योग सुरू करण्यासाठी एक कोटीपर्यंत अर्थसहाय्य करणारी योजना असून ३५ टक्के सबसिडी दिली जाते.
तर मध्यम उद्योग सुरू करण्यासाठी ५० कोटीपर्यंत अर्थसहाय्य करणारी योजना आहे.
या योजनेचा उद्योजकांनी लाभ घेऊन स्वतःसह अन्य लोकांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवावे.
यासाठी मी सर्वतोपरी मदत करेन, केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांना आपल्या भागात व मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगितले.
यात्रेच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने सुरू केलेल्या लोकोपयोगी योजनांची माहिती जनतेला दिली जात आहे, असे राणे म्हणाले.
अचरा येथें ढोल-ताशांच्या गजरात व लेझीम पथकाच्या नृत्याच्या तालावर जल्लोषी स्वागत करण्यात आले.
यावेळी स्वागताची सुरुवात आचरापार येथून बाईक रॅलीने करण्यात आली.
यावेळी हारतुरे देऊन राणे यांचे स्वागत केले गेले.राणे यांचे स्वागत करण्यासाठी विभागातील, विविध स्तरातील पदाधिकारी, नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती
जनआशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात शुक्रवारी दाखल झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी आचरा येथे राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे आमदार आशिष शेलार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी खासदार नीलेश राणे, दत्ता सामंत, आमदार कालिदास कोलंबकर, रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
तर आचरा येथे स्वागतप्रसंगी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, अशोक सावंत, सरोज परब, नीलिमा सावंत, मालवण सभापती अजिक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर,
पं समितीचे गटनेते सुनील घाडीगांवकर, सरपंच प्रणया टेमकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, चिंदर सरपंच राजेश्री कोदे, धोंडी चिंदरकर,
जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, डॉ.प्रमोद कोळंबकर, रावजी सावंत, संतोष कोदे, दीपक सुर्वे, हनुमंत प्रभ, प्रकाश मेस्त्री,मंगेश टेमकर,
अशोक बागवे, अवधूत हळदणकर, सचिन हडकर तसेच आचरा, तळाशील मच्छिमार बांधव, विविध बचतगटाच्या महिला.
किसान सन्मान योजनेचे शेतकरी, आचरा, मसुरे, चिंदर, त्रिंबक, आडवली, मालडी, शिरवंडे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.