नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास निविदेला मुदतवाढ | पुढारी

नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास निविदेला मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने सल्लागार नियुक्तीकरिता निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र, या निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने निविदा प्रक्रियेला आणखी 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी खासगीकरणातून फाळके स्मारकाचा पुनर्विकास करण्यात येणार होता. मात्र, त्यास विरोध झाल्याने महापालिका स्वत:च आता या स्मारकाचा विकास करणार आहे.

तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी फाळके स्मारकाचा खासगीकरणातून पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी स्वारस्य देकार मागविले असता, चित्रपट कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन. डी. स्टुडिओची निविदा अंतिम करण्यात आली होती. या संस्थेला कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया अंतिम असतानाच पुनर्विकासाबाबत संबंधित संस्थेबरोबर होणारा करारनामा महापालिकेच्या आर्थिक हिताविरोधात असल्याचा अभिप्राय लेखापरीक्षण विभागाने नोंदविला होता. तसेच माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील खासगीकरणातून होणार्‍या पुनर्विकासास विरोध करीत मनपानेच हा प्रकल्प हाती घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार मनपा प्रशासनाने महापालिकेच्या निधीतूनच हा प्रकल्प पुनर्विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊन 9 ऑगस्टपर्यंत निविदा सादर करण्याची मुदत होती. मात्र, या कालावधीत अवघी एकच निविदा प्राप्त झाल्याने प्रक्रियेला आणखी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. फाळके स्मारकाच्या पुनर्विकासासाठी निविदा अर्हतापूर्व बैठकीलाही ठेकेदारांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. फोर्थ डायमेन्शन्स आर्किटेक्ट्स पुणे व दिवेकर एजन्सी, मुलुंड या दोनच संस्थांनी प्री-बीडमध्ये सहभाग घेतला होता.

हेही वाचा:

Back to top button