पुण्यातील जाधव ज्वेलर्सची 3 कोटी 6 लाखांची फसवणूक | पुढारी

पुण्यातील जाधव ज्वेलर्सची 3 कोटी 6 लाखांची फसवणूक

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील जाधव ज्वेलर्सने बनवण्यासाठी दिलेला तब्बल आठ किलो 143 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा व 48 किलो चांदीचा असा तीन कोटी सहा लाखांचा अपहार करणाऱ्या कॅम्प येथील बलदोटा कुटुंबियांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लष्कर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.

सोने चांदीचे दागिने बनवणारे व्यापारी मेहुल रसिक बलदोटा (30) अनिता रसिक बलदोटा ( 52 ) शिवानी रसिक बलदोटा वैसत्ता (27) आणि मिथुन श्री मेहुल बलदोटा (28, सर्व रा. एक्झिबिशन रोड ऑफ इस्ट्रीट कॅम्प पुणे) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल दत्तात्रय जाधव (४४, रा. सम्राट गार्डन हडपसर) यांनी याबाबत लष्कर न्यायालयात धाव घेत खासगी तक्रार दाखल केली होती. हा प्रकार 2016 ते 2018 मध्ये घडला.

दाखल गुन्ह्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित आरोपी यांची मधू ऑनलाइन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. फिर्यादी यांच्या सराफी दुकानाला ग्राहकांच्या ऑर्डरनुसार लागणारे दागिने संशयित आरोपी बनवून देतो असा विश्वास संपादन केला. 2016 ते 2018 या कालावधीत फिर्यादी यांनी त्यांना 2 कोटी 44 लाख 29 हजारांचे 8 किलो 143 ग्रॅम सोन्याचे दागिने, 19 लाख 68 हजरांची 48 किलो चांदी तसेच 42 लाख रोख दिले. असा तब्बल 3 कोटी 5 लाख 97 हजारांचा ऐवज आणि रोकड दिली असताना माल आणि ऐवज परत केला नाही.

फिर्यादी यांनी त्याच्याकडे वेळोवेळी ऐवजाची मागणी करूनही त्यांना काहीही न मिळाल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना योग्य ती दाद न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात 156 (३) नुसार खासगी तक्रार दिली. त्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर बालदोटा कुटुंबियांवर कट रचणे, अपहार करणे, फसवणूक करणे, धमकावणे आणि संगनमत करणे यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक विश्वास डगळे करत आहेत.

Back to top button