…अन्यथा रस्त्यावर स्वातंत्र्यदिन; लोहगाव-वाघोली नागरिक विकास मंचचा प्रशासनाला इशारा | पुढारी

...अन्यथा रस्त्यावर स्वातंत्र्यदिन; लोहगाव-वाघोली नागरिक विकास मंचचा प्रशासनाला इशारा

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: पाऊस झाल्यानंतर लोहगाव-मुख्य रस्त्यावर वारंवार साचणार्‍या पाण्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांना होणार्‍या गैरसोयीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने 15 ऑगस्ट रोजी साचलेल्या पाण्यातच ध्वजवंदन करण्याचा इशारा लोहगाव-वाघोली नागरिक विकास मंचने दिला आहे. देशात 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सर्वत्र साजरा करण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र, स्वातंत्र्यास 75 वर्षे उलटूनही अद्याप पावसाळी लाईन नसल्याने लोहगाव परिसरातील मुख्य रस्त्यावर गेल्या आठ दिवसांपासून पावसाचे पाणी साचून आहे. पाणी वाहून जाणारे नैसर्गिक स्रोत पुढे बंद केल्याने रस्त्यावरच पाणी साचून रहात आहे. परिणामी वाहने पाण्यात बंद पडत असून वाहतूक कोंडी होत आहे.

महापालिका रस्त्यावर साचत असलेल्या पावसाळी पाण्याचा निचरा करू शकत नाही. स्मार्ट सिटीची वल्गना करणार्‍या पुणे महापालिकेचा पथ विभाग आणि मलनि:सारण विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने पाणी आठवडाभरापासून साचून आहे. सणासुदीचे दिवस असताना साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कुठे जाता येत नाही. स्कूल बस शाळेत उशिरा पोहोचत आहे. आजूबाजूच्या दुकानामध्ये पाणी शिरून दुकानदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. वाहने या पाण्यात बंद पडत असून, साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार वाढूनही प्रशासन गावकर्‍यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे.

प्रशासन राज आल्यापासून महापालिका अधिकारी नागरिकांची कामे करत नाहीत. लोकप्रतिनिधींनादेखील जुमानत नाहीत. अनेक वेळा तक्रारी करूनदेखील अधिकारी लक्ष देत नसल्याने तक्रारी करायच्या तरी कुणाकडे, असा प्रश्न पडतो.
                                                                     – विनायक शिंदे, दुकानदार

महापालिकेने जर या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन या साचलेल्या पाण्यात साजरा करून महापालिकेचा निषेध नोंदविण्यात येणार आहे.
                                        – मदन मोहन ठाकूर, स्थानिक रहिवासी

पावसाळा सुरू होण्यापूर्वी येथील समस्यांबाबत महापालिका प्रशासनाला जागेवर आणून दाखविली होती. मात्र प्रशासनाने उपाय योजना केली नाही. आता साचलेल्या पाण्याबाबत आयुक्तांशी चर्चा केली असून, त्यांनी उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

                                                                     – सुनील टिंगरे, आमदार

Back to top button