नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून त्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह यांसारख्या सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. रविचंद्रन अश्विनचे या छोट्या प्रकारात पुनरागमन झाले असले तरी नवोदित गोलंदाज उमरान मलिकचे नाव जाहीर झालेल्या यादीत नाही. आयपीएलमध्ये आपल्या वेगाने सवार्र्ंना चकीत करणारा उमरान फक्त तीन टी-20 सामने खेळून संघाबाहेर गेला आहे. त्याच्याजवळ वेग आहे; परंतु लेंग्थ आणि लाईन तो गोलंदाजी करीत नसल्याने त्याच्याकडून धावांची खैरात होत असल्याने तो महागडा ठरत होता. म्हणून त्याला डच्चू देण्यात आला आहे.
23 वर्षीय उमरानला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी पहिल्यांदा निवडण्यात आले; परंतु यामध्ये त्याला पाचही सामन्यांत राखीव बेंचवर ठेवण्यात आले. आयर्लंडमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले; परंतु त्यात त्याला फक्त एकच षटक मिळाले, तेही महागडे ठरले. दुसर्या टी-20 मध्ये त्याने शेवटच्या षटकांत विजय मिळवून दिला, तरीही तो महागडा ठरला होता. इंग्लंड विरुद्धच्या तिसर्या सामन्यात त्याला चार षटकांचा पूर्ण कोटा देण्यात आला. यात त्याने 56 धावा दिल्या. यातून त्याच्याजवळ वेग असला तरी स्वैर आणि दिशाहीन गोलंदाजीमुळे धावांचा पाऊस पडत असल्याने निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे.