मोठा निर्णय! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती | पुढारी

मोठा निर्णय! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला शिंदे सरकारकडून स्थगिती

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; उद्धव ठाकरे सरकारने आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे या बैठकीत निश्चित केले होते. आता या निर्णयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे पत्र दिल्यानंतर घेण्यात आलेली ही मंत्रिमंडळ बैठकच बेकायदेशीर असून हे निर्णय रद्द करून नव्याने मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २९ जूनला राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे पत्र दिले होते. मात्र या पत्रानंतर दुपारी उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला होता.

स्थानिक भूमिपुत्रांची मागणी पाहता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मागे घेत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णयही उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे निर्णय बेकायदेशीर असून नव्याने निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार या तिन्ही निर्णयांना आता स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मागवून नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

औरंगाबाद शहराच्या नामकरणाची पहिली मागणी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी चौतीस वर्षांपूर्वी म्हणजे १९८८ साली केली होती. एप्रिल १९८८ मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली, त्यात शिवसेनेचे ६० पैकी तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. या विजयानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मे १९८८ मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याची घोषणा केली. तेव्हापासून शिवसेनेचे पदाधिकारी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करतात.

सन २०१५ मध्ये शिवसेनेनं दिलं होतं नामांतराचं अश्वासन

औरंगाबादेतील सर्वच निवडणुकांमध्ये, विशेषत: महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शहराच्या नामकरणाचा मुद्दा गेली अनेक वर्ष गाजत आहे. सन २०१५ मध्ये औरंगाबाद महापालिका निवडणूका पार पडल्या, त्यावेळी राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं होतं. नामांतराचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडणार असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी निवडणूक प्रचारात सांगितलं. पण त्यावर ठोस निर्णय झाला नाही. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गतवर्षी पुन्हा एकदा हा विषय चर्चेला आला होता. तेव्हा शिवसेनेच्या सर्वच नेत्यांनी शहराचे नामकरण लवकरच होईल असं अश्वासन दिले. परंतु त्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने विरोध दर्शविला होता.

 हे ही वाचा :

Back to top button