दहिवडी; पुढारी वृत्तसेवा : गोंदवले बुद्रुक येथे सातारा-पंढरपूर रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कामातील दिरंगाई व प्रशासनाचा गोंधळ यामुळे काम सतत रखडत चालले आहे. गोंदवलेतील रस्ता चिखलमय झाला असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गावरून जाताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.
सातारा ते पंढरपूर रस्त्याचे काम गोंदवले येथील मुख्य चौकातच रखडले आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गेली दोन वर्षे काम अर्धवट आहे.त्यामुळे पावसाळ्यात खड्डे पडले तेथे पाणी साठत आहे. चिखल झाल्याने अनेक वाहने घसरुन अपघात होत आहेत. पायी चालणार्यांना सुद्धा जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यातच पावसाचे पाणी साचल्याने पाण्यातून वाहन गेल्याने रस्त्यावरून पायी चालणार्यांच्या अंगावर खड्ड्यातील पाणी उडत आहे. बांधकाम विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
गोंदवले ते दहिवडी रस्त्याचीही अवस्था बिकट झाली आहे. गेल्या एक वर्षांपूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा या रस्त्याची दुरवस्था झाली असून बांधकाम विभागाने या समस्येकडे पुन्हा लक्ष देऊन हे खड्डे तातडीने मुजवणे गरजेचे आहे.
श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या दर्शनासाठी रोज शेकडो वाहने या रस्त्यावरुन ये-जा करत असतात. तसेच दहिवडीवरून पंढरपूर व सोलापूरकडे जाणारा हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे हा रस्ता महत्त्वाचा आहे. त्यातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेल्या भागात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. काही ठिकाणी तर फक्त खड्डेच आहेत. रस्ता शिल्लकच राहिलेला नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून या रस्त्याचीही डागडुजी करणे गरजेचे आहे.