पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यातील बहुतांश भागात पावसाची (Maharashtra Rains) संततधार कायम आहे. राज्यातील विविध भागात बचावकार्यासाठी एकूण १४ एनडीआरएफ (NDRF) पथके आणि ६ एसडीआरएफ (SDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत. गेल्या २४ तासांत पावासाशी संबंधित ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ९९ वर पोहोचला आहे. १८१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ७,९६३ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन (Maharashtra Disaster Management) विभागाने दिली आहे.
मुंबई शहर व उपनगरात मध्यम स्ववरूपाचा पाऊस पडेल. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून ४५-५५ किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील तसेच ६५ किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
पालघर, पुणे आणि सातारा येथे आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rains)
पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू आहेत. मी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सर्व अधिकारी माझ्या संपर्कात आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आठ दिवसांपासून संततधार (Kolhapur Rain Update) सुरु असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी पासून राजाराम बंधार्यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे वेगाने झेपावत आहे. आज (दि. १५) सकाळी 9 वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.८ फुटांवर (पंचगंगा नदी इशारा पातळी – ३९ फूट व धोका पातळी – ४३ फूट आहे) पोहोचली. जिल्ह्यातील एकुण ६४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.