जळगाव मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून लाखोंची हप्ते वसुली; नगरसेवक नितीन लढ्ढांचा आरोप | पुढारी

जळगाव मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून लाखोंची हप्ते वसुली; नगरसेवक नितीन लढ्ढांचा आरोप

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच असताना अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत आहेत. अतिक्रमण विभागच भ्रष्टाचाराचे कुरण बनले असून, या विभागामार्फत लाखो रुपयांची हप्ते वसुली केली जात असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केला.

जळगाव महापालिकेची महासभा आज (दि. ७) महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसचिव सुनिल गोराणे उपस्थित होते. सभा सुरु असताना नगरसेवक बंटी जोशी यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणाचा विषय काढला. या विषयाला धरुन नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी अतिक्रमण विभागाची कुंडलीच महासभेत मांडली. अतिक्रमण विभागात भ्रष्टाचार वाढला असून, लाखोंची हप्ते वसुली केली जाते. हातगाडीधारकांकडून लाखो रुपये घेऊन जागा विकली जाते. हे विक्रेते मनपास भाडे देत नाहीत, मात्र संबंधित विभाग राजरोसपणे वसुली करत आहे. त्यामुळे अतिक्रणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.

…अन् महापौर जयश्री महाजन संतापल्या

अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे शहरातील कामे रखडली आहेत, नागरिक मात्र पदाधिकारी व नगरसेवकांना धारेवर धरत असल्याचे सांगत महापौर महाजन संतापल्या. कोट्यवधींच्या कामांचे प्रस्ताव तयार होतात, मात्र ते मंजूर होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराविषयी तीव्र संताप दिसून येत आहे. जनभावना तीव्र झाली असून, लोक पदाधिकाऱ्यांची लाज काढत आहेत. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यपध्दतीत सुधारणा करावी. अडलेल्या कामांचे प्रस्ताव, निवीदा प्रक्रिया व कामांच्या फाईली शनिवार आणि रविवारी पूर्ण करण्याचा आदेश महापौर जयश्री महाजन यांनी दिला.

४२ कोटींची कामे कधी मंजूर होणार?

उज्वला बेंडाळे यांनी ‘४२ कोटींची कामे कधीपासून ऐकतो आहे, ती केव्हा मंजूर होणार’ असा प्रश्न उपस्थिक केला. यावर नितीन लढ्ढा म्हणाले, आपल्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असताना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे कामांना मंजूरी मिळालेली नाही. म्हणूनच कोट्यावधींचे प्रस्ताव तयार करण्यापेक्षा कामे प्रत्यक्षात होणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यपध्दतीत बदल करणे गरजेचे असल्याचे लढ्ढा म्हणाले. तसेच तीन महिन्यांच्या आत प्रशासकीय मंजूरीची कामे पूर्ण करुन कामांचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचलंत का ?

Back to top button