परभणी : पाथरी शहरातील डॉक्टरचा रुग्णाच्‍या नातेवाईकांसोबत वाद; गुन्हा दाखल | पुढारी

परभणी : पाथरी शहरातील डॉक्टरचा रुग्णाच्‍या नातेवाईकांसोबत वाद; गुन्हा दाखल

पाथरी; पुढारी वृत्तसेवा: शहरातील एका वैद्यकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टरने दवाखान्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसोबत वाद घालत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ही घटना बुधवार (दि. ६ जुलै) रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली असून याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी डॉक्टरविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ पाथरी यांच्यावतीने प्रशासनास दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

डॉ. प्रीतम सोमानी असे शिवीगाळ करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. याबबातची माहिती अशी की, बुधवारी (दि. ६ जुलै) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोमठाणा (ता. माजलगाव) येथील मदन हिराजी भालेराव हे त्यांच्या दोन वर्षीय नातीला सलाईनसाठी लावण्यात येणारी सुई डॉक्टरांकडूनच व्यवस्थित लावून घेण्यासाठी पाथरी शहरातील डॉ. सोमानी यांच्या दवाखान्यात आले होते. यावेळी डॉ. प्रीतम सोमानी यांना सलाईनची सुई लावून देण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली असता त्यांच्यासोबत त्यांनी वाद घातला. दरम्यान डॉक्टरने त्यांना अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ केली. डॉ. सोमानी यांचा शिवीगाळ करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी बुधवारी संध्याकाळी उशिराने सोमानी यांच्याविरोधात मदन हिराजी भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईची मागणी

शहरातील वैद्यकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टरने पत्रकारांना केलेल्या केलेल्या शिवीगाळ प्रकरणी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ पाथरी यांच्यावतीने निषेध नोंदविला. यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासनाला डॉ. प्रीतम सोमानी यांनी पत्रकारांसह रुग्ण नातेवाईकांना शिवीगाळ केल्याने याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.  कारवाई न झाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर गोंगे, उपाध्यक्ष गजानन घुंबरे, पत्रकार विठ्ठल भिसे, धनंजय देशपांडे, मोहन धारासुरकर, खालेद नाज, सिद्धार्थ वाव्हळे, लक्ष्मण उजगरे, रमेश बिजुले, नागनाथ कदम, सुनील उन्हाळे, विठ्ठल साळवे व एल. आर. कदम यांच्या स्वाक्षरी आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button