राहुल गांधीविरोधातील इडीच्या कारवाई विरोधात धुळे जिल्हा काँग्रेसचा रास्ता रोको | पुढारी

राहुल गांधीविरोधातील इडीच्या कारवाई विरोधात धुळे जिल्हा काँग्रेसचा रास्ता रोको

धुळे : पुढारी वृत्तसेवा

इडी ने काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ धुळे जिल्हा काँग्रेस आक्रमक झाली आहे. या कारवाईच्या विरोधात आज काँग्रेसने महात्मा गांधी चौकात निदर्शने करून रास्ता रोको केले. केंद्र सरकार आकसाने काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात कारवाई करत असून खासदार राहुल गांधी यांच्या विरोधातील या कारवाईच्या विरोधात राज्यस्तरावर आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचा इशारा आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी दिला.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणांमध्ये इडीने खासदार राहुल गांधी यांची चौकशी सुरू केली आहे. केंद्र सरकार काँग्रेसच्या विरोधात यंत्रणांचा गैरवापर करीत असल्याचा आरोप करीत आज धुळ्याच्या महात्मा गांधी चौकात धुळे जिल्हा काँग्रेसने निदर्शने करीत आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनात आमदार कुणाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शहराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील तसेच राज्य कार्यकारिणीचे सदस्य युवराज करनकाळ, गुलाबराव कोतेकर, माजी आमदार डी. एस. अहिरे, नगरसेवक साबीर शेख, जिल्हा परिषद सदस्य गायत्री जयस्वाल, अशोक सुडके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार कुणाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनी पक्ष संघटन आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी च्या पोटात गोळा उभा राहिला असून त्यांनी दडपशाहीचे धोरण म्हणून इढीला पुढे करून कारवाई करण्याचे सत्र सुरू केल्याचा आरोप यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी केला.

इडीच्या माध्यमातून राहुल गांधी यांना बेकायदेशीरपणे अडचणीत आणण्याचे काम केले जाते आहे. मात्र काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आहे. केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला या हुकूमशाही पद्धतीने केलेल्या वागणुकीचे परिणाम 2024 मध्ये भोगावे लागणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. त्याचप्रमाणे इडीने आकस बुद्धीने कारवाई केल्यास काँग्रेसच्या माध्यमातून जेलभरो आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देखील या वेळी देण्यात आला. यानंतर महात्मा गांधी चौकातच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको करणारे आमदार कुणाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर तसेच प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य युवराज करनकाळ यांना आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button