

जामखेड: शहरातील समृद्धी कॉम्प्लेक्समधील युनिव्हर्सल स्पोर्टच्या दुकानांसमोरील कॉलमला दुकानाच्या जाहिरातीचा फलक लावण्याच्या कारणावरून दुकानदारासह त्याच्या मित्राला सहा जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सहाजणांवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सूरज अशोक निमोणकर यांचे जामखेड पंचायत समिती समोरील समृद्धी कॉम्प्लेक्समध्ये 17 क्रमांकाच्या गाळ्यात युनिव्हर्सल स्पोर्टचे दुकान आहे. या दुकानांसमोरील कॉलमवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास दुकानचालक सूरज निमोणकर व त्याचा मित्र विकास कचरू साळुंके स्पोर्टच्या जाहिरातीचा फलक चिटकावित होता. सूरज हा कटर आणण्यासाठी दुसर्या दुकानात गेला असता, त्यावेळेस कैलास विलास माने तेथे आला व त्याने कचरू साळुंके यास शिवीगाळ करून पलक लावण्यास विरोध केला. मी तीन वर्षे उगाच झेल भोगून आलो आहे का, असे सांगता मोबाईलवर सहकार्यांना बोलावून घेतले.
थोड्याच वेळात एका मोटारसायकलवरून तुषार हनुमंत पवार, बबलू जाधव व राहूल माने (पूर्ण नाव माहीत नाही) हे आले. इतर दोन अनोळखी व्यक्ती पायी आल्या. त्यांनी कैलास माने यांना विचारले कोण आहे, तेव्हा माने यांनी ते दोघे आहेत. त्यांना जिवंत सोडू नका, असे सांगताच बबलू जाधव याने विकास साळुंके व तुषार हनुमंत पवार यांनी विकासला तीन वेळा उचलून जमिनीवरील ब्लॉकवर आदळले.
नंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले, तसेच दोन अनोळखी व्यक्तींनी विकासला उचलून आपटले. यानंतर कैलास माने याने सूरज निमोणकर याला जिवंत सोडू नका, असे सांगताच बबलू जाधव याने सूरजला जीवे मारण्याच्या उद्देशाने दोन वेळा उचलून आपटले व इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतर लोक मध्यस्थीसाठी आले असता त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिले. जाताना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद सूरज अशोक निमोणकर यांनी दिल्यावरून पोलिसांनी कैलास विलास माने, बबलू जाधव, तुषार हनुमंत पवार, राहुल मानेे व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.