नाशिक : शाळा – महाविद्यालये गजबजणार ; बुधवारपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात प्रवेश | पुढारी

नाशिक : शाळा - महाविद्यालये गजबजणार ; बुधवारपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात प्रवेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मागील दोन वर्षांत कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू होत्या. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सोमवारी (दि.13) सन 2022-23 या नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पहिल्याच दिवशी शाळा उघडणार असून, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कामावर येणे बंधनकारक आहे. तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात बुधवार (दि.15)पासून प्रवेश दिला जाणार असल्याने त्यानंतरच शाळा गजबजणार आहे. त्यातच या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व स्टेशनरी देण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी प्रदीर्घ काळापासून शाळेपासून दूर आहे. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक तणावाचे दुष्परिणाम होत आहेत. शिक्षणातील गुणवत्ता कायम टिकून राहावी व मुलांना शाळेत आत्मविश्वासाने जाता यावे यासाठी शाळा पूर्वतयारी अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला आहे. तसेच गाव व वस्तीस्तरावर प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रवेशित करण्यासाठी गृहभेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात पटसंख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या मदतीने शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था व स्थानिक सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने शाळेची व परिसराची स्वच्छता व सुशोभीकरण करून घेतले जात आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रभातफेरीसह विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी आदी अधिकार्‍यांना शाळेमध्ये आमंत्रित केले जाणार आहे.

दरम्यान जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदींनाही शाळेच्या पहिल्या दिवशी पाचारण करण्यात येणार आहे. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहेे. तसेच स्थानिक कलाकार अथवा माजी विद्यार्थी यांच्यामार्फत शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत होणार
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवार (दि.13)पासून होत असून, शाळेत प्रवेश घेताना बालकांना उत्साहवर्धक व आनंदी वातावरण दिसेल यासाठी विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करा, असे निर्देश समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नाईकनवरे यांनी दिले आहेत. त्या द़ृष्टीने अधिकारी-कर्मचारी कामाला लागले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागात बेबनाव दिसून येत आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. दोन दिवस उशिरा विद्यार्थ्यांना शाळेत बोलून काहीही साध्य होणार नाही. उलट विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.
– नंदलाल धांडे, जिल्हाध्यक्ष,
खासगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघ

इंग्रजी माध्यमाच्या शाळा आजपासूनच भरणार
शाळा-महाविद्यालय सुरू करण्याबाबत राज्य शिक्षण विभागाचा गोंधळ सुरू आहे. मराठी माध्यमाच्या शाळा बुधवार (दि.15)पासून भरणार आहे. तर इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी (दि.13) सुरू होणार आहे. त्याद़ृष्टीने संबंधित शाळा व्यवस्थापनाचे नियोजन केले असून, पालकांनाही पूर्वसूचना देण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button