साेलापूर : सांगोल्यात 34 हजार विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके | पुढारी

साेलापूर : सांगोल्यात 34 हजार विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

सांगोला : पुढारी वृत्तसेवा :  सांगोला ालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांचे 2022-23 हे शैक्षणिक वर्ष आज सोमवार, 13 जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे शाळेची घंटा वाजणार आहे. तरीही विद्यार्थी प्रत्यक्षात बुधवार, दि. 15 जूनपासून शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे येत्या बुधवारपासून तालुक्यातील शाळांची घंटा वाजणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या 34 हजार 974 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके तर 14 हजार 373 शालेय विद्यार्थ्यांना 2 गणवेश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे यांनी दिली आहे.

कोरोना विषाणू मुळे मागील दोन वर्ष बंद- चालू- बंद अशा परिस्थितीत असलेल्या शाळा आता पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागामार्फत पूर्व तयारी झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश व पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत देखील केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप करण्याच्या दृष्टीने शाळा स्तरापर्यंत गणवेश व पाठ्यपुस्तके पोहोच करण्यात आले आहेत.

सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 389 व खाजगी 91 अशा एकूण 486 शाळा एकाच दिवशी सुरू होणार आहेत. दरम्यान 43 हजार 640 विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी 1003 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 13 जून रोजी पासून शाळा उघडल्या जाणार आहेत. 13 रोजी शिक्षक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दि. 15 जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवसापासून अध्यापन केले जाणार आहे.

तर शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील इयत्ता 1 ली. ते 8 वी. च्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमतीची तसेच दारियद्रेषेखालील सर्व असे एकुण 14 हजार 373 शालेय विद्यार्थ्यांना 2 गणवेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रति विद्यार्थी 600 रुपये प्रमाणे 86 लाख 23 हजार 800 रुपयांचे शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश अनुदान सांगोला तालुक्यासाठी प्राप्त झाले आहेत.
शाळा स्तरावर पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत प्रभाकर कुमठेकर यांनी योग्य नियोजन केले. तसेच सर्व विषय तज्ज्ञ -विशेष तज्ज्ञ व मोबाईल टीचर यांनी पुस्तक वाटपासाठी सहकार्य केले, असेही गटशिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे यांनी सांगितले आहे.

असे पुस्तक वाटप नियोजन आहे

इयत्ता पहिलीसाठी 3 हजार 895, इयत्ता 2 रीसाठी 3 हजार 455, इयत्ता 3 रीसाठी 3 हजार 856, इयत्ता 4 थीसाठी 4 हजार 068, इयत्ता 5 वी. साठी 4 हजार 500, इयत्ता 6 वीसाठी 4 हजार 624, इयत्ता 7 वीसाठी 5 हजार 186, इयत्ता 8 वीसाठी 5 हजार 390 असे एकूण 43 हजार 640 विद्यार्थ्यांसाठी 34 हजार 974 पाठ्यपुस्तके वाटप केली जाणार आहेत.

Back to top button