पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यासाठी 405 जणांनी 430 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांवर शुक्रवारी सुनावणी झाली. मात्र, यातील दिग्गजांच्या अर्जांवर हरकती घेण्यात आल्याने त्यांचे अर्ज बाजूला ठेवले होते. या अर्जांवर सोमवार, 13 जून रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तिरंगी लढतीतील प्रमुख उमेदवारांचे अर्ज वैध ठरणार की व अवैध, याचा फैसला होणार आहे.
श्री विठ्ठल कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 3 ते 9 जून या कालावधीत इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार इच्छुकांनी चांगला प्रतिसाद दिला. 405 इच्छुकांनी 430 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.या अर्जांवर शुक्रवार, 10 रोजी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत अनेक आजी-माजी संचालकांचे अर्ज नामंंजूर झाले आहेत. तर, कारखान्याची निवडणूक लावण्यात ज्यांचा अधिक रस होता, अशा दिग्गज मंडळींच्याही अर्जांवर विरोधकांनी हरकती घेतल्या आहेत. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांनी हरकती घेतलेल्या अर्जांवर निर्णय राखून ठेवले आहेत.
धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, अॅड. गणेश पाटील, समाधान काळे यांच्या अर्जांवर हरकती घेतल्याने त्यांच्या अर्जांवर निर्णय होणार आहे. त्यामुळे निर्णय काय होतो, याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे. निवडणूक लढविण्यास पात्र ठरण्यासाठी संबंधितांनी लगतच्या 5 पैकी 3 हंगामात कारखान्याला ऊस पुरवठा करण्याची प्रमुख अट आहे. यामुळे पहिल्याच झटक्यात अनेकांच्या इच्छा-आकांक्षांवर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे आजी-माजी संचालकांसह अनेक इच्छुकांचेही अर्ज नामंजूर झाले.
दरम्यान, हरकती आलेल्या अर्जांवर दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद झाले. परंतु, निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांनी निकाल राखून ठेवला. यातच शनिवारी व रविवारी शासकीय सुट्टी आल्याने या हरकतींवर आता सोमवारी फैसला होणार आहे. त्युमळे अभिजित पाटील, अॅड. गणेश पाटील, समाधान काळे यांच्या अर्जार्ंवर काय निर्णय होतो, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
हरकती पूर्ण झाल्यावर अर्ज माघारीकडे लक्ष
उमेदवारी अर्ज भरलेल्या अर्जांवर निवडणूक निर्णय अधिकार्यांनी फैसला दिल्यानंतर इच्छुकांची धाकधूक कमी होणार आहे, तर अर्ज हरकती छाननीअंती 13 ते 27 जून या काळात अर्ज माघारी घेण्याची मुदत राहणार आहे. त्यांनतर नेत्यांना पॅनेलेच्या बांधणीसाठी इच्छुकांना माघारीसाठी विनंती करावी, लागणार असून त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.