अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये एकूण अनुक्रमे 382.50 अंक व 1465.79 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 16201.8 अंक व 54303.44 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टी व सेन्सेक्स डळमळीत होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात भडकलेले खनिज तेलाचे दर आणि त्यामुळे रुपया चलनात सातत्याने होत असणारी पडझड असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत. रुपया चलन आजपर्यंतच्या सर्वाधिक कमकुवत पातळीला पोहोचले. शुक्रवारच्या सत्रात रुपया 11 पैसे कमजोर होऊन 77.85 रुपये प्रती डॉलर स्तरावर बंद झाले. अमेरिकेत महागाई दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तेथील मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. अधिक व्याजदराच्या अपेक्षेने गुंतवणूकदारांचा ओढा विकसित राष्ट्रांकडे वळला आहे. त्यामुळे डॉलर हा इतर सर्व विकसनशील राष्ट्रांच्या चलनाच्या तुलनेत मजबूत होत आहे.

* आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीचा भडका. ब्रेंट क्रुड तसेच अमेरिकेचे डब्ल्यूटीआय क्रुड यांनी 120 डॉलर प्रती बॅरलची पातळी गत सप्ताहात ओलांडली. कोरोनाच्या धक्क्यातून जग पूर्वपदावर येत असल्याने कच्च्या तेलाच्या मागणीत वाढ झाली. यातच पश्चिमेकडील राष्ट्रांनी रशियामधून पुरवठा होणार्‍या खनिज तेलावर निर्बंध घातले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची कमतरता आहे. भारतीय कंपन्यांनी रशियामधील तेल उत्खनन कंपनी रोजनेफ्टशी कमी किमतीत खनिज तेल मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या सरकारी कंपन्या तसेच रिलायन्स, नायरायासारख्या खासगी कंपन्या पुढील सहा महिन्यांसाठी बाजारभावापेक्षा 20 ते 30 टक्के किमतीत खनिज तेल मिळवण्यासाठी पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रोजनेफ्टशी करार करण्यास उत्सुक आहेत. फेब्रुवारीपासून आतापर्यंत भारताने रशियाकडून 40 दशलक्ष बॅरल तेल आयात केले. मागील वर्षी रशियाकडून सरासरी 34 हजार बॅरल दरदिवशी आयात केली जात होती. यावर्षी मे महिन्यात रशियाकडून तब्बल 7 लाख 40 हजार दरदिवशी या प्रमाणात तेलाची आयात करण्यात आली.

* रिझर्व्ह बँकेने रेपो रेट अर्ध्या टक्क्यांची वाढ करून 4.90 टक्क्यांवर नेले. मागील दहा वर्षांतील ही सर्वात मोठी वाढ आहे. रिझर्व्ह बँकेने देशातील किरकोळ महागाई दर (रिटेल इन्फ्लेशन) 6 टक्क्यांखाली ठेवण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. परंतु आर्थिक वर्ष 2023 साठी महागाई दर अंदाज 5.7 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. हे असले तरी जीडीपी वृद्धी दर अंदाज मात्र 7.2 टक्क्यांवर कायम ठेवला आहे.

* भारताची औद्योगिक प्रगती दर्शवणारा निर्देशांक आयआयपी ग्रोथ इंडेक्स मागील आठ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर. एप्रिल महिन्यात आयआयपी (इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रॉडक्शन) 7.1 टक्क्यांवर पोहोचला. मार्चमध्ये आयआयपी दर 1.9 टक्के होता.

* एलआयसी ‘आयपीओ’मधील अँकर इन्व्हेस्टरची (प्रमुख संस्थात्मक गुंतवणूकदार) गुंतवणूक कालावधी सीमा (लॉक इन पिरेड फॉर अँकर इन्व्हेस्टर) सोमवारी संपणार. आतापर्यंत एलआयसीच्या समभागामध्ये सुमारे 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. 949 रु. प्रतिसमभाग किमतीवर आलेल्या आयपीओची किंमत सध्या 709.70 रुपये आहे. एलआयसीचे बाजार भांडवलमूल्य 6.02 लाख कोटींवरून 4.49 लाख कोटींपर्यंत खाली आले आहे. भांडवल बाजारमूल्याचा विचार करता, एलआयसीचे स्थान देशांतर्गत भांडवल बाजारात 7 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. केंद्र सरकार लवकरच याप्रकरणी लक्ष घालेल, असे प्रतिपादन दीपम संस्थेचे सचिव तुहीन कांत पाडे यांनी केले.

* ‘आयपीएल’च्या प्रायोजकत्वाच्या लिलावातून अ‍ॅमेझॉन आणि गुगल कंपनीची माघार. 2023 ते 2027 या कालावधीसाठी प्रसारण हक्क लिलाव करण्यात आला असून डिस्नेस्टार, रिलायन्स व्हायकॉम 18, सोनी नेटवर्क्स यांच्यामध्ये प्रसारण हक्क मिळवण्यासाठी चुरस आहे. याद्वारे बीसीसीआयला 45 ते 60 हजार कोटी मिळणे अपेक्षित आहे. यापूर्वी 2017 साली स्टार स्पोर्टसने 16.347 कोटींना पाच वर्षांसाठी प्रसारण हक्क विकत घेतले होते. यावेळी बीसीसीआयने प्रसारण हक्कांसाठी बोलीची किमान आधारभूत किंमत 32890 कोटी इतकी निश्चित केली आहे.

* गुंतवणुकीमधील इक्विटीचे प्रमाण वाढवण्यासाठी ‘इम्प्लॉईज प्रॉव्हिडंड फंड ऑर्गनायझेश’ प्रयत्नशील. सध्या प्रॉव्हिडंड फंडाच्या एकूण निधीपैकी 15 टक्के निधी इक्विटी सदरात गुंतवण्याची मुभा आहे. परंतु हे प्रमाण 25 टक्क्यांवर नेण्याची गरज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली. 2015 साली एकूण निधीच्या 5 टक्के निधी इक्विटी सदरात गुंतवण्याची मुभा प्रॉव्हिडंट फंडाला होती. मागील 7 वर्षांत सरासरी 14 टक्के दराने इक्विटी सदराने परतावा दिला. 2021-22 साली प्रॉव्हिडंड फंडाचा (रिटर्न) परतावा मागील 40 वर्षांच्या न्यूनतम स्तरावर म्हणजेच 8.1 टक्क्यांवर खाली आला. आता परतावा वाढवण्याच्या द़ृष्टीने इक्विटीमध्ये सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू. सध्या ईपीएफओकडे 18 लाख कोटींचा निधी.

* इक्विटी प्रकारच्या म्युच्युअल फंडामध्ये मे महिन्यात गुंतवणुकीचा ओघ (फंड इन्फ्लोज) 16 टक्क्यांनी वधारून 18529.4 कोटी झाला. सर्वाधिक निधी (2485 कोटी) ‘लार्ज कॅप’ प्रकारात, तर हायब्रीड प्रकारात 1007.37 कोटींचा निधी आला.

* नॅशनल हायवेज अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 1750 किमी रस्त्यांचे कंत्राटीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. याद्वारे सुमारे 20 हजार कोटींचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.

* अमेरिकेत महागाई दर मागील 40 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर. किरकोळ महागाई दर (सीपीआय इन्फेक्शन) 8.6 टक्क्यांवर. ऊर्जा क्षेत्राचा महागाई दर सर्वाधिक 34.6 टक्क्यांवर पोहोचला.

* 3 जून रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेशी चलन गंगाजळी 306 दशलक्ष डॉलर्सनी घटून 601.057 अब्ज डॉलर्स झाली.
प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

Back to top button