Nashik : लासलगाव वगळता जिल्ह्यात पावसाची उसंत | पुढारी

Nashik : लासलगाव वगळता जिल्ह्यात पावसाची उसंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लासलगाव वगळता जिल्ह्याच्या अन्य भागांमध्ये रविवारी (दि.12) पावसाने उसंत घेतली. त्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होऊन उकाड्यात प्रचंड वाढ झाली. दरम्यान, जिल्ह्यात मान्सून पूर्ण क्षमतेने दाखल होण्यासाठी आणखीन तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे.

तळकोकणासह मुंबई तसेच राज्याच्या काही भागांत मान्सून डेरेदाखल झाला आहे. कोकण किनारपट्टी भागात पावसाची संततधार सुरू आहे. पण त्याचवेळी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्याच दरम्यान, मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वादळी वारे व मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन सर्वसामान्यांची उकाड्यातून सुटका झाली. मात्र, रविवारी (दि.12) लासलगाव व परिसर वगळता अन्य जिल्ह्यांत पावसाने विश्रांती घेतली. लासलगाव व भागात झालेल्या पावसापासून कांदा व भाजीपाला वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ उडाली. नाशिक शहरात दिवसभर ढगाळ हवामान असले तरी पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी नाशिककरांना घामाच्या धारा लागल्या. दुसरीकडे जिल्ह्याच्या अन्य भागांतही परिस्थिती वेगळी नाही. त्यामुळे उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी जिल्हावासीयांच्या नजरा आता आकाशाकडे लागलेल्या आहेत.

नगरसूलसह परिसरात दमदार
येवला तालुक्यातील नगरसूल व परिसरात रविवारी (दि. 12) जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत. गत दोन-तीन दिवसांत तालुक्यातील काही भागांत सोसाट्याच्या वार्‍यासह दमदार पाऊस झाला होता. मात्र, नगरसूल भागात पाऊन झाला नसल्याने पावसाकडे लक्ष लागले होते. मात्र, रविवारच्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे बियाणे – खते घेण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button