Nashik : मनमाड व परिसरास वादळी वार्‍यांसह पावसाचा तडाखा | पुढारी

Nashik : मनमाड व परिसरास वादळी वार्‍यांसह पावसाचा तडाखा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
वादळी वारे आणि जोरदार पावसाने बुधवारी (दि. 8) मनमाड शहर व परिसराला प्रचंड तडाखा दिला. ग्रामीण भागात वार्‍याच्या जोराने शेकडो झाडे उन्मळून पडली. अनेक घरांसोबत शाळांची छपरे उडाली. मोठ्या प्रमाणात गोरगरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले. रेल्वे रूळ आणि यार्डमध्ये उभ्या असलेल्या एका रेल्वेवर झाड कोसळले.

गेल्या चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यातील ग्रामीण भागात धुमाकूळ घालत आहे. सोमवारी देवळा तालुक्यातील गिरणारे येथे वादळामुळे मोठे नुकसान झाले. त्याचीच पुनरावृत्ती मनमाड शहर परिसर आणि ग्रामीण भागात झाली. सायंकाळी 4.30 नंतर वादळ आले. सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी पडल्या; मात्र त्यानंतर विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा जोर वाढला. पावसापेक्षा वादळच जास्त होते. सोसाट्याच्या वार्‍यामुळे शेकडो झाडे उन्मळून पडली. अनेक घरांसोबत शाळा, मंगल कार्यालये यांची छपरे उडून गेली. वादळी वार्‍यामुळे गोरगरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त होऊन त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. वादळ आणि पावसामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

आमदार सुहास कांदे यांना माहिती मिळताच त्यांनी अधिकार्‍यांशी संपर्क साधून वादळ आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची सूचना केली आहे. चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला मार्गावर असलेले व्यापारी आणि शेतकर्‍यांचे कांद्याचे शेड आणि चाळी जमीनदोस्त झाल्यामुळे शेकडो टन कांदा भिजला आहे. रेल्वे रुळावर झाड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे स्थानकावरदेखील झाडाच्या फांद्या तुटून पडल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एसटी आगाराच्या मुख्य गेटसमोर असलेले झाड उन्मळून पडले. नागापूर, पानेवाडी, माळेगाव कार्यात यासह ग्रामीण भागातदेखील वादळ आणि पावसाने कहर केला. काही ठिकाणी गारपीटदेखील झाली असून, घरांची पडझड झाली.

महामार्गावर वाहने जागीच थांबली..
आगारातून एसटी बाहेर पडण्यास अडचण झाली. ठिकठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. कांद्याचे अनेक शेड जमीनदोस्त झाले आहेत. ठिकठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. वादळाच्या भयावहतेमुळे बाजारासाठी आलेल्या लोकांची भीतीपोटी पळापळ झाली. शहरातून जाणार्‍या पुणे-इंदूर महामार्गावर समोरचे काहीही दिसत नव्हते. त्यामुळे चालकांनी जागच्या जागी वाहने थांबवून घेतली होती.

राज्यसभेची निवडणूक असल्यामुळे मी मुंबईला आहे. मात्र, मला मनमाड शहर परिसर आणि ग्रामीण भागात वादळ व पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती मिळाली असून, मी तातडीने अधिकार्‍यांशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली आहे. ही नैसर्गिक आपत्ती असून, नुकसानग्रस्तांनी चिंता करू नये.
– सुहास कांदे, आमदार

हेही वाचा :

Back to top button