अक्‍कलकोट बसस्थानक अस्वच्छतेचे आगार | पुढारी

अक्‍कलकोट बसस्थानक अस्वच्छतेचे आगार

अक्कलकोट : पुढारी वृत्तसेवाश्रीक्षेत्र अक्‍कलकोट येथील राज्य परिवहन महामंडळ बसस्थानक अस्वच्छतेचे आगार बनले आहे. इमारत नूतनीकरणासाठी 5 कोटींहून अधिक रक्कम मंजूर होवूनही अद्यापही कामाला सुरुवात नाही. बसस्थान जीर्ण आणि परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, स्थानक परिसरात चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाब नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर प्रशासनाने याचा बंदोबस्त नाही केल्यास लवकरच आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांतून देण्यात आला आहे.

अक्कलकोट बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य, आरक्षण दालनाचे शून्य व्यवस्थापन, अतिक्रमणाचा विळखा निर्माण झाला आहे. स्थानकात पोलिस चौकी नसल्याने तळीराम, पाकीटमार मोठ्या प्रमाणात सुळसुळाट सुरू असून, याबाबत आगारप्रमुख, विभागीय नियंत्रक यांचे नियंत्रणच नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असणार्या अक्कलकोट शहरामध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या बरोबरच सदरचे बसस्थानक हे कर्नाटक, आंध्र, सिमांध्र यांना जोडणारे महाव्दार असल्याने दररोज 50 हजारांहून अधिक प्रवाशांची ये-जा असते. यामधील बहुतांश भाविक असून, परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. या प्रवाशांच्या दर्शनाच्या निमित्ताने महामंडळाला दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते, असे असतानाही येथे येणार्‍या भाविकांना बसस्थानकांमध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

प्रवाशांना बसस्थानकाच्या परिसरात पिण्यास पाणी नाही, वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था नाही, स्वच्छता गृहांची मोठी समस्या असून बसस्थानकाच्या मागील बाजूस उघड्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून याचा सामना भक्तांना करावा लागत आहे. बसस्थानकाच्या परिसरात रस्ते नसल्याने मातीचे ढिगारे, अस्वच्छता, धुळीचे साम्राज्य, डुकरे, गाढव, मोकाट जनावरांनी उच्छांद मांडला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून पाऊस सुरू झाल्यानंतर बसस्थानकाला डबक्याचे स्वरुप येवून संपूर्णत: घाणीचे साम्राज्य पसरले जाते.
याबरोबरच बसस्थानकाची इमारत ही संपूर्णत: जीर्ण झालेली असताना फलाटांपेक्षा अंतर्गत दुकाने ही मोठ्या प्रमाणात झालेली असून महामंडळाच्या नियमानुसार दुकान गाळ्यांची जागा व्यवस्थित वाटप न झाल्याने प्रवाशांना जुन्या दुकानदारांना सदर जणांच्या दुकानामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे, याची दखल घेतील रा.प.मं.ने घेण्याची मागणी पुढे येत आहे.

राज्य शासनाकडून श्रीक्षेत्र अक्कलकोट बसस्थानकास 5 कोटीहून अधिक रक्कम नूतनीकरणासाठी जाहीर करण्यात आली. याबाबत तालुक्यातील विविध पक्षांच्या पुढार्‍यांनी श्रेयवाद ज्याप्रमाणे घेतला. त्याप्रमाणे अद्याप कामास का? प्रारंभ नाही असा जाब विचारायला हवा होता. मात्र, असे न झाल्याने याचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. नुकतेच एसटीचे 75 व्या अमृत महोत्सव साजरा करीत असताना निदान राज्यातील महत्त्वाच्या तीर्थस्थळी असणार्या बसस्थानकाबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. या तीर्थस्थळातील अक्कलकोट बसस्थानक व आगाराची दयनीय अवस्था झाल्याने याबाबत राज्याचे परिवहन मंत्री ना. अनिल परब व परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, महाव्यवस्थापक (वाणिज्य) माधव काळे यांनी लक्ष घालण्याची मागणी पुढे येत आहे.

दररोज हजारो भाविक घेतात दर्शन

अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर हे राज्यातील टॉप फाईव्ह तीर्थक्षेत्रामध्ये समाील आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनसाठी येतात. मात्र, या लोकांना आधी अक्कलकोट बसस्थानकातील घाणीचे दर्शन होते. तसेच बसस्थानक परिसरातील चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाही बसस्थानकाची सुरक्षा रामभरोसे राहिली आहे. याबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Back to top button