

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अनेक नवे उद्योग येण्यास उत्सुक असून, बरेच प्रकल्प सध्या नाशिकमध्ये येण्याबाबत चाचपणी करताना दिसत आहेत. दावोस येथे झालेल्या परिषदेतदेखील नाशिकमध्ये गुंतवणूक करण्याबाबत अनेक उद्योगांनी घोषणा केल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी एक उद्योग मालेगाव येथील अंजग-रावळगाव एमआयडीसीत येणार असून, सुमारे 150 कोटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून 500 रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
सध्या जिल्ह्यातील बहुतांश एमआयडीसीत नवे उद्योग आले असले तरी, मालेगाव एमआयडीसी काहीशी दुर्लक्षित असल्याचे दिसून आले. दरम्यान, व्हेलियंट इंडस्ट्रिज ही टेक्स्टाइल कंपनी मालेगावात आल्याने, अजंग-रावळगाव एमआयडीसीला ऊर्जितावस्था येण्याची शक्यता आहे. दावोस येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विविध कंपन्यांबरोबर सुमारे 80 हजार कोटींच्या करारांवर सह्या केल्या. याअंतर्गत डोंबिवली येथील व्हेलियंट ग्रुपने मालेगावातील अजंग एमआयडीसीमध्ये प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार कंपनीचे विशाल पचेरिवाला यांनी राज्य सरकारबरोबरच्या एमओयूवर सह्या केल्या आहेत.
कंपनीला एमआयडीसीने यापूर्वीच 50 एकर जागा उपलब्ध करून दिली असून, त्यापोटी 12 कोटी रुपये एमआयडीसीकडे भरण्यात आले आहेत. कंपनीच्या बेडिंग डिव्हिजनच्या विस्तारासाठी मालेगावची निवड केली आहे. यातून सुमारे पाचशे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे. उद्योगमंत्री देसाई यांनी टि्वट करून याबाबतची घोषणा केली आहे. या करारामुळे मालेगावाच्या टेक्स्टाइलला व्यवसायाला पुन्हा अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.
मालेगावला टेक्स्टाइल पार्क विकसित करण्यात येत असून, त्याद़ृष्टीने कंपन्यांकडून गुंतवणूक केली जात आहे. व्हेलियंट इंडस्ट्रिजची दीडशे कोटींची गुंतवणूक असून, त्यासाठी 50 एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
– नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी