8 लाख रुपये खर्च, तरीही नगरकरांना मिळेना पुरेसे पाणी: 40 किलोमीटरहून येते पाणी | पुढारी

8 लाख रुपये खर्च, तरीही नगरकरांना मिळेना पुरेसे पाणी: 40 किलोमीटरहून येते पाणी

सूर्यकांत वरकड

नगर : 40 किलोमीटर अंतरावरून मुळा धरणातून नगर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला दररोजचा आठ लाख रुपये खर्च येतो. एवढा खर्च होऊनही नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. शहराला पूर्ण दाबाने मुबलक पाणी पुरवठा करून देणारी अमृत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे अपूर्ण राहिललेल 70 मीटर काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर नगरकरांना पुरेसे पाणी मिळेल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

शहरात सुमारे 60 हजार अधिकृत नळ कनेक्शनधारक आहेत. मुळा धरणातून 725 ते 400 अश्वशक्तीच्या पंपाद्वारे उपसा करून पाणी विळद पंपिंग स्टेशन येथे आणले जाते. विळद पंपिंग स्टेशनमधील जलशुद्धीकरण केंद्रातून वसंत टेकडी येथे पाणी येते. तेथून शहरातील 32 उंचावरील व जमिनीलगतच्या टाक्यांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. या सगळ्या प्रक्रियेला म्हणजेच मुळा धरणातून पाणी थेट वसंत टेकडीपर्यंत आणण्यासाठी मोठा खर्च येतो.

सांगवीतील पुलाच काम निकृष्ट; उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार

दरमहा सुमारे अडीच कोटी रुपयांचे वीज बिल महापालिकेला भरावे लागते. पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनला गळती लागल्यास दुरूस्तीसाठी वीस लाखांचा खर्च करावा लागतो. परिणामी महापालिकेच्या तिजोरीवर बोजा पडतो. एवढा खर्च करूनही नगरकरांच्या पाण्याची दररोजची कटकट सुरूच आहे.

पाणीपुरवठा विभाग आणि नगरसेवकांना रोजच नागरिकांच्या पाण्याच्या तक्रारीला सामोरे जावे लागते. दरम्यान, शहरात सुमारे 1 लाख मालमत्ताधारक आहेत. प्रत्यक्षात नळजोडण्या मात्र 60 हजारांच्या आसपासच आहेत. त्यामुळे तब्बल 40 हजार मालमत्ताधारकांकडे नळजोडणीच नाही, की ते अनधिकृत नळपाणी वापरतात, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तीन वर्षे रेंगाळले ‘अमृत’

नगरकरांना मुबलक पाणी मिळाण्यासाठी अमृत योजना आखली. अमृत अभियानांतर्गत नगर शहर पाणीपुरवठा योजनेला 1 नोव्हेंबर 2017 मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला. कार्यरंभ आदेश दिल्यानंतर हे काम 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. कामाच्या संथ गतीमुळे हे काम अद्याप झालेले नाही. हे काम केवळ 70 मीटर अपूर्ण होते. ते कामही पूर्ण झाले असून, तीन ठिकाणी अडथळे होते ते दूर करण्यात मनपाला यश आहे. लवकरच दोन ते तीन ठिकाणी शिल्लक राहिलेली पाईप जोडणी करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

शेणखत, कोंबडीखताच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदिल

दहा एमएलडी पाणी वाढ

अमृत योजनेसाठी पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. किरकोळ पाईप जोडणी राहिली असून, येत्या काही दिवसांत ती पाईप जोडणी करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच योजनेची चाचणी घेण्यात येईल. सध्या शहराला 72-73 एमएलडी पाणी मिळत आहे. अमृत योजना कार्यान्वीत झाल्यानंतर त्यात दहा एमएलडी पाणी वाढ होईल. त्यामुळे शहराला पूर्ण दाबाने पाणी देणे शक्य होणार आहे.

‘अमृत’चे आकडे

स्वीकृत निविदा             : 107.45 कोटी
केंद्र सरकाचा निधी        : 56.68 कोटी
राज्य सरकारचा निधी     : 28.33 कोटी
14/15 आयोगाचा निधी  : 27.47 कोटी
आतापर्यंतचा निधी         :112. 48 कोटी
आजपर्यंतचा खर्च 112 कोटी

पालेभाज्यांसह टोमॅटो, गवारी, सोयाबीनचा भाव वाढला

तारखा सांगतात…

एप्रिल 2017- ‘अमृत’ला प्रशासकीय मान्यता
3 जुलै 2017 – स्थायी समितीत ठराव
1 नोव्हेंबर 2017- कार्यरंभ आदेश
31 ऑक्टोबर 2019- काम पूर्णत्वाची मुदत
31 मे 2022- काम अंमित टप्प्यात

 

 

Back to top button