पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीसाठी पाऊल | पुढारी

पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीसाठी पाऊल

पांडुरंग सांडभोर

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महाविकास आघाडीसाठी पाऊल पडले आहे. आघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पहिल्या औपचारिक बैठकीत जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. तर शिवसेनाही या दोन पक्षांबरोबर आघाडीच्या वाटेवर असून महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर गतआठवड्यात महिला आरक्षणही जाहीर झाले आहे. त्यामुळे आता जवळपास प्रत्येक प्रभागातील चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आगामी काळात महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतील. त्यामुळे राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीनेही पालिका निवडणुकांसाठी तयारीला सुरुवात केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या योजना घरोघर पोहचवा : आ. राधाकृष्ण विखे पाटील 

पुणे महापालिकेतील आघाड़ीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शहराच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक महिला आरक्षण सोडतीनंतर नुकतीच झाली. या बैठकीत प्रामुख्याने जागा वाटपाच्या मुद्यावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला विद्यमान जागा आणि गत पालिका निवडणुकीतील दुसर्‍या क्रमांकाच्या जागा देण्याचा जुनाच फॉर्म्युला पुन्हा दिला.

तर काँग्रेसकडून मात्र पन्नासपेक्षा अधिक जागांवर दावा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, दोन्ही बाजूंनी जागा वाटपावर सामंजस्याने मार्ग काढून आघाडी करण्याबाबत एकमत झाले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी आघाडीबाबत औपचारिक बैठक झाल्याचे सांगितले.

तसेच ज्या जागी काँग्रेस विजयी होऊ शकते त्यावरील दावा सोडणार नाही, असे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याकडून आघाडीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसारच कार्यवाही होत असल्याचे सांगण्यात आले. एकंदरीतच आघाडीसाठी दोन्ही बाजूंनी एक पाऊल पुढे पडल्याने आघाडीची गाडी रुळावर आली आहे.

शिवसेनेकडून सकारात्मक प्रतिसाद

काँग्रेस- राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास शिवसेनाही सकारात्मक असल्याचे शिवसेनेच्या शहराच्या पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. तीन पक्षांची आघाडी झाली तर आमच्या 50 जागांवर दावा असेल, आघाडी टिकविण्यासाठी आम्ही एक पाऊल पुढे आणि वेळ आली तर एक पाऊल मागेही घेऊ, असे या पदाधिकार्‍याकडून स्पष्ट करण्यात आले.

मविआचे सरकार हे वसुली सरकार, त्यांनी लावलेल्या सर्व चौकशा संशयास्पद : दरेकर

नरसाळीत झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत

कांदा न खाल्ल्याने कोणी मेले आहे का?, सदाभाऊ खोत यांचा घणाघात

Back to top button