

पुणे : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षकांचे कार्यमूल्यमापन करण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने समितीची स्थापना केली आहे. या समितीला शिक्षकांच्या कार्य मूल्यमापनासंदर्भातील अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने धोरणाचा अभ्यास करून शिफारसी सादर करण्यासासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती.
या समितीच्या शिफारसींना अनुसरून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षकांच्या शैक्षणिक कालावधीतील कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये तंत्रशिक्षणच्या पुणे विभागाचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रा. एस. टी. इंगळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. सुप्रिया पाटील, नागपूरच्या कमला नेहरू महाविद्यालयातील प्रा. सुभाश्री मुखर्जी, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील डॉ. समीर तेरदाळकर, भिवंडीच्या बी. एन. एन. महाविद्यालयातील डॉ. सुधीर निकम, पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य विठ्ठल बांदल यांचा समावेश आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अधिसूचनांचा अभ्यास करून मार्गदर्शक सूचना तयार करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी कार्यमूल्यमापनासाठी कोणत्या घटकांचा समावेश करावा, या बाबतच्या शिफारशी करणे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची भूमिका आणि कक्ष अधिक सक्षम करण्याच्या उपाययोजना करणे अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.
हेही वाचा