IPL 2022 : ‘या’ पाच वादांमुळे आयपीएलला लागले गालबोट | पुढारी

IPL 2022 : ‘या’ पाच वादांमुळे आयपीएलला लागले गालबोट

मुंबई : कोरोनाच्या सावटातून बाहेर पडून आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धा बीसीसीआयने जबरदस्त यशस्वी करून दाखवली. जगातील सर्वात श्रीमंत, ग्लॅमरस असलेली ही स्पर्धा त्यामुळे आणखीनच चर्चेचा विषय बनली आहे. नवख्या गुजरात टायटन्सने या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. ही स्पर्धा गाजली असली तरी काही प्रसंगांनी त्याला गालबोटही लागले.

चेन्नई संघातील कॅप्टन्सी ड्रामा

स्पर्धा सुरू होण्याआधी एक दिवस चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. अचानक धक्का देण्याच्या त्याच्या आजपयर्र्ंतच्या स्वभावाला साजेशी अशी ही कृती होती. त्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे सीएसकेच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली; पण धोनीची परंपरा पुढे चालवण्याचा दबाव तो सहन करू शकला नाही. त्याच्या नेतृत्वात संघाने सुरुवातीच्या काही लढती गमावल्या. शिवाय, त्याची कामगिरीही खालावली. त्यामुळे त्याने नेतृत्व सोडले आणि दुखापतीमुळे तो स्वत:ही संघातून बाहेर पडला. त्याच्यात आणि संघ व्यवस्थापनामध्ये बेबनाव असल्याच्या काही बातम्याही आल्या होत्या.

ऋषभ पंत झाला बॅड बॉय (IPL 2022)

साखळी फेरीत राजस्थान आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना. दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी 36 धावा करायच्या होत्या. पहिल्या तीन चेंडूंवर रोव्हमन पॉवेलने सलग तीन षटकार ठोकून तीन चेंडूंत 18 धावांचे टार्गेट आणले. चौथा चेंडू हा फुलटॉस होता. तो कमरेच्या उंचीवर असल्याने नो बॉल द्यावा, असे ऋषभ पंत बाहेरून इशारे करीत होता. परंतु, पंचांनी हा चेंडू योग्य असल्याचे सांगितल्यावर ऋषभने आपल्या फलंदाजांना मैदानातून बाहेर येण्याची सूचना केली. या मुद्द्यावरून भारतीय संघाचा भावी कर्णधार समजल्या जाणार्‍या ऋषभला क्रिकेट तज्ज्ञ, चाहत्यांचे खूप ऐकून घ्यावे लागले.

‘डीआरएस’ बनला व्हीलन

मुंबई आणि चेन्नई या दोन बलाढ्य संघांदरम्यान वानखेडे मैदानावर दुसरा सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून चेन्नईला फलंदाजी दिली; पण या सामन्यात तांत्रिक कारणामुळे पहिल्या दहा चेंडूंपर्यंत ‘डीआरएस’ची सोय उपलब्ध नव्हती. विशेष म्हणजे, या दहा चेंडूंतच चेन्नईने दोन विकेट गमावल्या. यामध्ये डेवॉन कॉन्वेचा पायचितचा निर्णय संशयास्पद होता. जर ‘डीआरएस’ उपलब्ध असता, तर तो कदाचित नाबाद राहिला असता; पण पंचांचा निर्णय अंतिम असल्याने कॉन्वे बाद झाला आणि हा सामना चेन्नईने गमावला.

हर्षल-रिआनची फाईट

राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रिआन पराग आणि रॉयल चॅलेंजर्सचा गोलंदाज हर्षल पटेल यांच्यात मैदानावरच जुंपली. पंचांनी आणि इतर खेळाडूंनी हा वाद सोडवला असला, तरी हर्षलने सामना संपल्यावर परागसोबत हस्तांदोलन करणे टाळले.

सदोष पंचगिरी

या स्पर्धेत पंचांचे काही निर्णय हे विवादास्पद ठरले. विशेषत:, रोहित शर्मा, विराट कोहली, केन विलियम्सन यांना बाद ठरवल्यामुळे पंचांवर टीका करण्यात आली. याशिवाय अनेकवेळा नो बॉल, वाईड बॉल देणेही शंकास्पद होते. तंत्रज्ञान हाताशी असतानाही खराब पंचगिरी हा एकूणच स्पर्धेच्या दर्जावर परिणाम करणारा विषय ठरतो आहे.

Back to top button