Saptashringigad : सप्तशृंगगडावरील अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी | पुढारी

Saptashringigad : सप्तशृंगगडावरील अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगगडावर पहिल्या पायरीपासून संपूर्ण गावात ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी गाळे बांधले आहेत. येथे विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली असून, गाळ्यांसमोरील जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याने गडावर येणार्‍या भाविकांना पायी चालणेदेखील कठीण होत आहे.

गडावर दररोज हजारो भाविक दर्शनास येतात. त्यामुळे येथे विक्रेत्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, आपलीच विक्री अधिकाधिक व्हावी म्हणून प्रत्येकानेच रस्त्यावर चार ते पाच फुटांपर्यंत अतिक्रमण केलेले आहे. रस्त्यावरच नारळ, हार, वेण्या, तेल, पेढे, खेळणीचे स्टॉल, पूजेचे साहित्य मांडलेले असते. हॉटेल व्यावसायिकही यात मागे नाहीत. अनेक हॉटेलचालकांनी रस्त्यावरच टेबल-खुर्च्या मांडून रस्ता अरुंद केला आहे. त्यामुळे भाविकांना ही दुकाने ओलांडून पुढे जाताना कसरत करावी लागते. पहिली पायरी ते दाजीबा समाधी मंदिरापर्यंत 12 मीटरचा रस्ता असूनही व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे हा रस्ता केवळ सहा ते सात मीटरचा उरला आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांवरही अनेक प्रकारची अतिक्रमणे वाढली आहेत.

उतरत्या पायरीजवळही हीच परिस्थिती झाली असून, काही महिन्यांपूर्वी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने येथील व्यावसायिकांना अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, पुढे कुठलेच पाऊल न उचलल्याने अतिक्रमणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
हीच परिस्थिती फनिक्युलर रोपवे ट्रॉलीच्या रस्त्यावर आहे. येथील व्यावसायिकांनी दुतर्फा अतिक्रमण केल्याने रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.

मुख्य रस्ते झाले अरुंद
दुतर्फा वाहने उभी केल्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी टोकाची भूमिका घेत कारवाई करण्याची गरज आहे. सप्तशृंगगडावर नारळ, प्रसाद, खेळणी तसेच खाद्यपदार्थांची दुकाने चालवली जातात. दुकानाच्या बाहेर रस्त्यावर मांडणी करून त्याची विक्री करीत असतात. सप्तशृंगगडावरील मुख्य रहदारीचे रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे येथे वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत असते.

सप्तशृंगगडावर दररोज हजारो भाविक दर्शनास येत असतात. परंतु, येथील व्यावसायिकांनी आपले स्टॉल रस्त्यावर मांडल्याने भाविकांना ये-जा करणे कठीण झाले आहे. अतिक्रमणाबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत अतिक्रमण काढले नाही, तर कारवाई करण्यात येईल.
– बबनराव पाटोळे, पोलिस उपनिरीक्षक, सप्तशृंगगड

हेही वाचा :

Back to top button