इजिप्तमध्ये तब्बल 2500 वर्षांपूर्वीच्या वस्तूंचा शोध | पुढारी

इजिप्तमध्ये तब्बल 2500 वर्षांपूर्वीच्या वस्तूंचा शोध

कैरो : इजिप्तमधील प्राचीन काळातील वस्तूंची देखभाल करणार्‍या विभागाचे प्रमुख मुस्तफा अल वजीरी यांनी म्हटले आहे की बूबस्तीन दफनभूमीत 2500 वर्षांपूर्वीच्या वस्तूंचा एक खजिनाच सापडला आहे. बस्टेटच्या प्राचीन देवीच्या नावावर हे स्थान होते. या देवीचा चेहरा मांजराचा होता असे म्हटले जाते. अनेक देवी-देवतांच्या मूर्ती व दागदागिने याठिकाणी सापडले आहेत.

अल वजीरी यांनी सांगितले की या ठिकाणी केलेल्या उत्खननात इमहोटेपचा पुतळाही सापडला आहे. त्याच्या मकबर्‍याचाही लवकरच शोध लागेल असे त्यांनी म्हटले आहे. इमहोटेप हा एक बहुचर्चित आर्किटेक्ट होता असे म्हटले जाते. त्यानेच इजिप्तमधील 4700 वर्षांपूर्वीच्या पिरॅमिडस्चे डिझाईन बनवले होते. इजिप्तमधील राजे म्हणजेच फेरोंचा तो मुख्य स्थापत्यविशारद होता. पुरातत्त्व संशोधकांना याठिकाणी कांस्य धातूची अनेक भांडीही सापडली आहेत. प्रजननाची देवी आयसिसच्या पूजेसाठी या भांड्यांचा उपयोग केला जात असे. दोन ठिकाणी दफन केलेल्या 250 लाकडी शवपेट्याही सापडल्या आहेत. या शवपेट्यांवर चित्रे असून त्यांच्यामध्ये ममी आहेत. या शवपेट्या इसवी सन पूर्व 747 ते इसवी सन पूर्व 332 या काळातील आहेत. विशेष म्हणजे या नव्या संशोधनात प्रथमच सुस्थितीमध्ये असलेले एक भूर्जपत्रही मिळाले आहे.

Back to top button