नाशिक: आदिवासी कलेची नाशिककरांना भुरळ | पुढारी

नाशिक: आदिवासी कलेची नाशिककरांना भुरळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सागवान लाकडावर चितारलेली कलाकृती, गवतापासून तयार केलेल्या वस्तू, वारली चित्रकला आणि आदिवासी खाद्यसंस्कृतीची भुरळ नाशिककरांना पडली आहे. आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या या वस्तू खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.

आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ईदगाह मैदान येथे आदिवासी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात नाशिकसह पालघर, नंदुरबार आणि राज्याच्या कानाकोपर्‍यातून आदिवासी बांधव त्यांच्या कलाकृती घेऊन दाखल झाले आहेत. पालघरचे चिकू, बदामसह चिकूचे लोणचे, मशरूम, हळद, नागली पीठ, सेंद्रिय तांदूळ, भगर अशा विविध खाद्यपदार्थांचा यात समावेश आहे. तसेच सागवानी लाकडापासून तयार केलेल्या कलाकृती, वारली चित्रकला कलाकृती, वनौषधी, आदिवासी बांधवांचे पारंपरिक दागदागिने, मुलांची खेळणी तसेच वेत व बांबूकाम, काष्ठशिल्पे, धातूकाम आदी वस्तूदेखील विक्रीसाठी आहेत. याशिवाय तरपा व आदिवासी वाद्येही पाहणे व खरेदी करता येणार आहे. दरम्यान, येत्या मंगळवारपर्यंत (दि.31) चालणार्‍या या महोत्सवात आदिवासी नृत्य आणि लघुपट दाखविण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाशिककरांना आदिवासी संस्कृती जवळून अनुभवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

हेही वाचा:

Back to top button