नाशिक : कणकोरीसह पाच गावे पाणीयोजनेचा खेळखंडोबा; छोट्या गावांना येते जादा पाणीपट्टी | पुढारी

नाशिक : कणकोरीसह पाच गावे पाणीयोजनेचा खेळखंडोबा; छोट्या गावांना येते जादा पाणीपट्टी

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
कणकोरीसह पाच गाव पाणीपुरवठा योजना दर आठ दिवसाला काही ना ना काही कारणास्तव बंद पडत आहे. योजनेतील कमी लोकसंख्येच्या कणकोरी गावाला जास्त तर नांदूरशिंगोटे, मानोरी गावांना अल्प पाणीपट्टी भरावी लागत असल्याचा आरोप होत आहे.

आठ दिवसांपूर्वी या योजनेचे वीजबिल थकल्यामुळे योजना पूर्ण कोलमडलेली होती. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यावाचून भटकंती करण्याची वेळ आली आहे. योजना सुरळीत चालू ठेवण्यासाठी कमिटीची स्थापना केलेली आहे. मात्र, बर्‍याच दिवसांचा कालावधी गेल्यानंतर कमिटीची एकही बैठक झाली नसल्याचा आरोप माजी उपसरपंच रामनाथ सांगळे यांनी केला आहे. केवळ समिती स्थापन झाल्यानंतर एक बैठक करण्यात आली होती. बैठकीत जे गाव जितके पाणी वापरेल तितके पाणीपट्टी ठरविली जाईल, असे ठरले होते. मात्र या योजनेवर असलेले कमिटीचे सचिव ग्रामविस्तार अधिकारी यांनी आजपर्यंत काहीही निर्णय घेतलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. या योजनेद्वारे भोजापूर धरणातून नांदूरशिंगोटे, मानोरी, कणकोरी, मर्‍हळ आदी गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. आज नांदूरशिंगोटे गावाला 5 लाख लिटर पाण्याची गरज असून, गाव केवळ 47 हजार रुपये इतके महिन्याला वीजबिल भरते. मानोरी गावाला दीड लाख लिटर पाण्याची मागणी असून, ग्रामपंचायत 15 हजार इतके बिल महिन्याकाठी भरते. कणकोरी गावाला केवळ 50 हजार लिटर पाणी मागणी असून, आजही ही ग्रामपंचायत साडेबारा हजार इतके बिल भरते. मात्र, यासंदर्भात सुधारित बिलांसाठी कणकोरीचे माजी उपसरपंच रामनाथ सांगळे यांनी मागणी करूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. नांदूरशिंगोटे व मानोरी यांना अल्प पाणीपट्टी भरावी लागत असल्याने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

गटविकास अधिकार्‍यांकडून केराची टोपली
कणकोरीच्या सरपंच योगिता सांगळे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला. तथापि, या पत्रास केराची टोपली दाखवली असल्याचा कणकोरी ग्रामस्थांनी केला आहे. तेव्हा पाणीपुरवठा योजनेच्या कमिटीची बैठक घेऊन याची दखल घ्यावी. ऐन टंचाईच्या काळात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यावाचून वंचित ठेवण्याचा प्रकार करू नये, असे माजी उपसरपंच सांगळे यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा:

Back to top button