कोल्हापूर : व्हीएफएक्स, अ‍ॅनिमेशन रोजगार देणारी मोठी इंडस्ट्री : प्रा. चांदणे | पुढारी

कोल्हापूर : व्हीएफएक्स, अ‍ॅनिमेशन रोजगार देणारी मोठी इंडस्ट्री : प्रा. चांदणे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दिवसेंदिवस व्हीएफएक्स व अ‍ॅनिमेशनचे क्षेत्र वाढत आहे. यात करिअर व रोजगाराच्या मोठ्या संधी कमी कालावधीत उपलब्ध होतात, असे प्रतिपादन व्हीएफक्स, अ‍ॅनिमेशन तज्ज्ञ प्रा. मधूर चांदणे यांनी केले. दै. ‘पुढारी’ आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत एज्युदिशा-2022 शैक्षणिक प्रदर्शनात ‘व्हीएफएक्स व अ‍ॅनिमेशनमधील करिअर’ या विषयावर ते बोलत होते. प्रा. चांदणे यांनी पॉवर पाईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्हीएफएक्स, अ‍ॅनिमेशनची माहिती
दिली.

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात बाहेर पडताना न आल्याने चित्रपट आणि वेबसीरिज पाहण्याकडे ओढा होता. यात व्हीएफएक्स व अ‍ॅनिमेशनचा वापर केला जातो. ही फार मोठी इंडस्ट्री असून करोडो रुपयांची उलाढाल होते. व्हीएफक्स करताना एक सेकंदाच्या सीनसाठी 1400 फोटोवर काम करावे लागते. त्याचबरोबर ग्रीन व ब्लू क्रोमाशूटच्या माध्यमातून बॅकग्राऊंड कटिंगचे काम केले जाते. जगभरात भारताचा व्हीएफएक्स, अनिमेशन इंडस्ट्रीचा वाटा 20 टक्के आहे.

बॉलीवूडसह हॉलीवूडच्या चित्रपटाचे काम कोल्हापुरात बसून करता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासाबरोबरच वेगळ्या पर्यायाचा शोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रा. मनोज जाधव यांनी एमकेसीएल कोर्सेसची माहिती दिली. दहावी-बारावीनंतर संगणक कोर्सेससाठी एमकेसीएल, मुक्त विद्यापीठ, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ यांचा संयुक्त कोर्स सुरू करण्यात आला आहे. क्लिक कोर्स उपलब्ध
आहेत.

वसीम मुलाणी म्हणाले, विद्यार्थी दहावी-बारावीनंतर पारंपरिक अभ्यासाकडे वळतात. मात्र व्हीएफएक्स, अ‍ॅनिमेशनसारखे कोर्स विद्यार्थ्यांसमोर आधुनिक जगातील पर्याय आहेत. हे कोर्सेस फिचर रिलेटेड असून रोटो, पेंट कंपोजिटी असे प्रकार असतात. चित्रपट, वेबसीरिज बंद पडणार नाहीत. त्यामुळे व्हीएफक्स, अ‍ॅनिमेशन क्षेत्र सुरू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी रोजगार आणि व्यावसायिक द़ृष्टिकोन ठेवून करिअर निवडावे.

Back to top button