नाशिक : सिन्नर शहरातील गुंडगिरी, चोर्‍यांना आळा घाला : भाजपा | पुढारी

नाशिक : सिन्नर शहरातील गुंडगिरी, चोर्‍यांना आळा घाला : भाजपा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांत शहर व परिसरामध्ये गुंडगिरी, चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून, या गुन्हेगारीला तत्काळ आळा घालावा, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सिन्नर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले.

शहरांमध्ये अवैध धंद्यांबरोबरच गुंडगिरी, चोर्‍या, हाणामार्‍या असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. हे प्रकार पोलिस यंत्रणा गंभीरपणे घेणार आहे का? की, भाजपला शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलिसांविरुद्ध जनआंदोलन करावे लागेल? असा खडा सवाल निवेदनात करण्यात आला आहे. उपनगरामध्ये व शहरामध्ये दुचाकी, चारचाकी वहानांची चोरी, भरदिवसा महिलांचे मंगळसूत्र खेचणे हे नित्याचेच होऊन बसले आहे. संपूर्ण तालुक्यात पोलिस यंत्रणा सुस्त झालेली दिसत असल्याचा आरोपही करण्यात आला. शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तत्काळ पावले उचलावीत, अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, तालुका प्रभारी जयंत आव्हाड, शहराध्यक्ष मनोज सिरसाट आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस चौक्या रिकाम्या – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसरातील पोलिस चौक्या पोलिसांविना रिकाम्या दिसतात. त्याबाबतही निर्णय होणे आवश्यक आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री साडेदहाच्या सुमारास शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती, आर्किटेक्ट इंजिनिअर समाधान गायकवाड व त्यांच्या चालकासह कार्यालयातील कर्मचार्‍यांना गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून बेदम मारहाण झाली. अद्याप टोळके फरार आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण झाल्याचे भाजप पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा:

Back to top button