भारतीयांनी बहुभाषी होणे गरजेचे; ’जेएनयू’च्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांचे मत | पुढारी

भारतीयांनी बहुभाषी होणे गरजेचे; ’जेएनयू’च्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘अनुवादित साहित्यात आवश्यक तो आशय येत नाही. त्यासाठी आपण बहुभाषी होणे अतिशय महत्त्वाचे आहे,’ असे मत जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या (जेएनयू) नवनियुक्त कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय संबंध व परराष्ट्र धोरण विषयातील तज्ज्ञ डॉ. शांतीश्री पंडित यांची नुकतीच जेएनयूच्या कुलगुरुपदी नियुक्ती झाली.

यानिमित्ताने डॉ. पंडित यांचा सत्कार निवृत्त परराष्ट्र अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. एस. के. जैन, एकता मासिक फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र घाटपांडे आदी उपस्थित होते. डॉ. पंडित म्हणाल्या, आपण एकभाषी झालो आहोत, बहुभाषी नाही. ज्यांना इंग्रजी उत्तम येते, त्यांना संस्कृत येत नाही; तर ज्यांना संस्कृत उत्तम येते, त्यांना इंग्रजी येत नाही. भारतीय विचारधारेमध्ये स्त्रीवाद आहे. आपला धर्म ही लोकशाहीच आहे. भारत एक सांस्कृतिक राज्य आहे.

ते आता औद्योगिक क्रांतीमध्येही सामील झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि नागरी राष्ट्रवाद, यामध्ये भरपूर विचार आणि वाद सुरू आहेत. डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले की, विविध प्रकारच्या भाषा ही भारताला मिळालेली एक महत्त्वाची देण आहे. दुर्दैवाने हे आपण विसरायला लागलो आहोत. जशी आपण आपल्या मालमत्तेची काळजी घेतो, तशीच आपल्या भाषेची काळजी घेतली पाहिजे. भाषा ही सामूहिक विद्वत्ता आणि जाणिवांचे स्वरूप आहे.

Back to top button