बेळगाव : कुत्र्यावरून भांडण तिसर्‍यांदा पोलिस ठाण्यात : पोलिसांनी दरडावताच दोघींमध्ये घडला समेट | पुढारी

बेळगाव : कुत्र्यावरून भांडण तिसर्‍यांदा पोलिस ठाण्यात : पोलिसांनी दरडावताच दोघींमध्ये घडला समेट

बेळगाव : संजय सूर्यवंशी
एकीने पाळलेल्या कुत्र्याची शिक्षिकेला नेहमीच अ‍ॅलर्जी… बोळातून घराकडे जाताना नेमका तिच्याकडे बघूनच भुंकणार.. तेव्हा साहजिकच तोंडातून हाच्य… हाच्य… असेच बाहेर पडणार… पण, मालकीणीला आपल्या कुत्र्याला हाच्य… म्हटलेलं नाही आवडलं… ये बाई… माझ्या कुत्र्याला हाच्य.. हाच्य.. नाही म्हणायचं…! बाबू… बाबू म्हणायच… मग ते नाही भुंकत… झालं. यावरूनच सुरू झालेलं भांडण शेवटी पोलिस ठाण्यात जाऊन मिटलं.

कुत्र्यावरून भांडण – हाच्य.. हाच्य.. नव्हे, बाबू.. बाबू..

त्याचं झालं अस की… रामलिंगखिंड गल्ली परिसरातील एका बोळवजा गल्लीत एका बाईने कुत्रा पाळलाय…. ही बाई तो कुत्रा नेहमी एकतर रस्त्यावर सोडते किंवा लांब साखळी करून बांधते… त्यामुळे येणार्‍या जाणार्‍यांना नेहमीच डोकेदुखी.. या घराच्या बाजूलाच एका शिक्षिकेचे घर आहे. निवृत्तीकडे झुकलेल्या या शिक्षिकेला दररोज या कुत्र्याजवळून जाण्याचे दिव्य पार पाडावे लागते. ते कुत्रं काही भुंकायचं सोडत नाही. त्यामुळे ते भुंकलं की निसर्ग नियमानुसार तोंडातून हाच्य हाच्य… किंवा हाड… हाड… बाहेर पडणारच… या शिक्षिकेनेही कुत्रे भुंकू लागल्यावर हाच्य.. हाच्य.. असे म्हटले अन् नेमके हेच शब्द कुत्र्याच्या मालकिणीने ऐकले अन् भांडण सुरू झाले.
हाच्य.. हाच्य.. नव्हे बाबू.. बाबू.. माझ्या कुत्र्याला तू हाच्य.. हाच्य .. म्हटलीशच कशी…? त्याला बाबू बाबू असं म्हणायचं…! मग ते भुंकत नाही अन्यथा ते भुंकणारच… असे म्हणताच शिक्षिका देखील चवताळली.. तुझा बाबू तुझ्या घरात… त्याचा दररोजचा नुसता व्याप झालाय… बाबू म्हणायला का ते माणूस आहे का? कुत्रं ते कुत्रंच… इतके म्हणताच कुत्रं गप्प बसून मालकीणच भुंकल्यासारखी तणतणायला लागली. दोघींचे भांडण इतके जुंपले की ते अर्वाच्च शिवीगाळीवर जाऊन पोहोचले.

दोघीही पोलिस ठाण्यात

प्रकरण खडेबाजार पोलिसांत गेले. दोघींनीही आपापली बाजू अधिकार्‍यासमोर मांडली. परंतु, जेव्हा हाच्य.. हाच्य.. अन् बाबू… बाबू… चा मुद्दा आला तेव्हा पोलिस अधिकार्‍यालाही हसू आवरेना. त्यांनी दोघींनाही समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघीही ऐकत नव्हता.
साहेब भडकले अन् भांडण मिटले हे भांडण मिटवताना साहेबांना समजलं की हे कुत्रे प्रकरण तिसर्‍यांदा आपल्या ठाण्यात आलंय. तेव्हा साहेबही जाम भडकले. आम्हाला दुसरीही कामे असतात, तुम्ही असं करा दोघीही तक्रार द्या, दोघींनाही अटक करतो अन् कारागृहात पाठवतो… आज रात्रीचे जेवण तुम्ही दोघीही हिंडलगा कारागृहात जाऊनच करा… अशी भूमिका साहेबांनी घेतल्यानंतर दोघीही थोड्या नरमल्या अन् निघून गेल्या. सध्या तरी हे भांडण मिटल्यासारखं वाटतंय. परंतु, ते कुत्रं पुन्हा भुंकणार अन् शिक्षिका किंवा अन्य कोणी तरी त्याला हाच्य… हाच्य… म्हणणारच… तेव्हा साहेबांनी हे भांडण मिटले या गैरसमजुतीत राहू नये इतकेच….!

श्‍वानप्रेमी विरोधात द्वेषधारी

अनेकांचं श्‍वानप्रेम इतके प्रचंड असतं की त्यांच्या कुत्र्याला कोणी कुत्रा म्हटलं तरी आवडत नाही. त्याला कुत्रे नाही म्हणायचं त्याचं नाव घ्यायचं… असे आपसूकच सांगतात. श्‍वानप्रेमी शेजारी एखादा कुत्र्याचा प्रचंड तिरस्कार अन् द्वेषधारीही असतो. साहजिकच यातून शेजार्‍यांमध्ये भांडण हे ठरलेलंच असतं. अनेक भांडणे गल्लीत होतात अन् मिटतात, तर काही पोलिस ठाण्यापर्यंत जातात. गेल्या सहा महिन्यांत अशी अनेक भांडणे आपल्याकडेही आल्याचे अन्य पोलिस अधिकारी सांगतात.

Back to top button