नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रंगकाम करण्याच्या बहाण्याने साडेआठ लाख रुपयांची रोकड व 300 ग्रॅम वजनाचे सोन्याची बिस्किटे चोरून नेणार्या एकास मुंबईनाका पोलिसांनी अटक केली आहे. संजय रजेपाल यादव (रा. जि. कानपूर, उत्तर प्रदेश) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी साडेसहा लाख रुपयांची रोकड व मोबाइल जप्त केला आहे.
चांडक सर्कल येथील गौरव अतुल चांडक यांच्या घरात 14 मे रोजी रंगकाम करणार्या कारागिरांनी चोरी करून रोकड व सोने चोरून नेले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत होते. पोलिसांच्या तपासात चोरटे ठेकेदारामार्फत रंगकाम करीत होते. त्यावरून मुंबईनाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली पथक उत्तर प्रदेश येथे गेले.
पथकाने तपास करून कानपूर जिल्ह्यातून संजय यादव यास पकडले. त्याच्याकडून रोकड व मोबाइल जप्त केला आहे. या चोरीत संजय सोबत साहिल मकसुद मन्सुरी हादेखील सहभागी असल्याचे पोलिस तपासात आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी संजयचा ताबा घेत त्यास नाशिकला आणले. न्यायालयात हजर केले असता संजयला मंगळवार (दि.24)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत अहिरे, सहायक निरीक्षक के. टी. रौंदळे, अंमलदार रोहिदास सोनार, अनिल आव्हाड, आप्पा पानवळ, समीर शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.