कोल्हापूर : नालेसफाईतून 1118 टन गाळ काढला; तरीही… | पुढारी

कोल्हापूर : नालेसफाईतून 1118 टन गाळ काढला; तरीही...

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील नाल्यांतून तब्बल एक हजार 118 टन गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने नालेसफाईची मोहीम 17 मार्चपासून सुरू झाली आहे. आतापर्यंत सुमारे 75 टक्के नाले सफाईचे काम पूर्ण झाले. मात्र तरीही जयंती नाला प्लास्टिक कचर्‍याने ओसंडून वाहत आहे.

शहरातील 47 प्रभागांमधील 282 चॅनेलची सफाई पूर्ण झाली आहे. नाल्यातून काढलेला गाळ 221 हायवा व डंपरचे सहाय्याने कात्यायनी कॉम्प्लेक्स या ठिकाणी भरावासाठी टाकण्यात आला. उर्वरित प्रभागातील गाळ काढण्याचे काम 30 मे पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत पावसाळ्यापूर्वीच्या चॅनेल, ओढे, नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे.

शहरातील एन. टी. सरनाईकनगर ते रामानंद नगर ते महालक्ष्मी हॉस्पिटल, हॉकी स्टेडियम ते रेणुका मंदिर, मंडलिक पार्क येथील नाल्यातील गाळ पोकलॅनद्वारे काढण्यात आला. सध्या मंडलिक पार्क ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे काम सुरू आहे. हे काम संपल्यानंतर दुधाळी नाला व शाम सोसायटी नाला, हुतात्मा पार्क ते वाय. पी. पोवार नगर, वाय. पी. पोवार नगर ते वर्षा नगर पूल नाल्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच दुसर्‍या पोकलॅनद्वारे आर. के. नगर नाका ते आंबेडकर हॉल राजेंद्रनगर, राजेंद्रनगर ते मनोरमा हॉटेल, मनीषानगर ते वर्षानगर पूल, गणपती मंदिर ते रिलायन्स मॉल, रिलायन्स मॉल ते गाडी अड्डापर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या मशिनद्वारे सध्या गाडी अड्डा ते जयंती नाला काम सुरू आहे.

आजअखेर जेसीबीद्वारे 47 प्रभागांत 282 चॅनेलची सफाई पूर्ण करण्यात आली आहे. नालेसफाईसाठी 60 कर्मचार्‍यांचे दोन पथक, दोन पोकलॅन मशिन, दोन जेसीबी मशिन, दोन हायवा व दोन डंपर इतकी यंत्रणा कार्यरत आहे.

Back to top button