Sri Lanka Crisis : श्रीलंकेत केवळ १ दिवस पुरेल इतकेच पेट्रोल शिल्लक, पैसे छापावे लागतील : पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे | पुढारी

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत केवळ १ दिवस पुरेल इतकेच पेट्रोल शिल्लक, पैसे छापावे लागतील : पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे

कोलंबो; पुढारी ऑनलाईन

Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती गंभीर बनली आहे. येथील पेट्रोल साठा संपला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे नवनियुक्त पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी सोमवारी देशाला संबोधित करताना, देशात केवळ एक दिवस पुरेल इतकाच पेट्रोल साठा शिल्लक असल्याचे स्पष्ट केले होते.

Indian credit line अंतर्गत डिझेलच्या आणखी दोन खेप १८ मे आणि १ जून रोजी येणार आहेत. याशिवाय, पेट्रोलच्या दोन खेप १८ आणि २९ मे पर्यंत श्रीलंकेत पोहोचणे अपेक्षित आहे. त्यानंतर श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कमी करण्यात मदत होईल, अशी आशा विक्रमसिंघे यांनी व्यक्त केली आहे.

विक्रमसिंघे म्हणाले की, एखादा व्यक्ती, कुटुंब अथवा गट नाही तर देशाला संकटातून वाचवणे हे आपले उदिष्ट्य आहे. “पुढील काही महिने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण असतील. आम्ही येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे,” असे आवाहन विक्रमसिंघे यांनी केले आहे.

श्रीलंकेची अर्थव्यवस्था धोकादायक स्थितीत (Sri Lanka Crisis) आहे. २०२२ मधील अर्थसंकल्पीय तूट जीडीपीच्या १३ टक्के एवढी आहे. देशाला इंधन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी पुढील काही दिवसांत देशाला ७५ दशलक्ष डॉलर परकीय चलन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

श्रीलंकेतील १४ लाख सरकारी नोकरदारांना मे महिन्याचा पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. त्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून पैसे छापणे सुरू ठेवावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Back to top button